मुंबई – राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha election)रंगत शिगेला पोहचलेली आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस राहिले असल्याने शिवसेना-भाजपा नेत्यांची (Shivsena-BJP)अपक्ष आमदारांचा आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चांगलीच धडपड सुरु आहे. या निवडमुकीत महत्त्व आल्याने छोट्या पक्षाचे नेते आणि अपक्ष आमदारही त्यांची नाराजी व्यक्त करतायेत, तसेच त्यांच्या मागण्याही मांडत आहे. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur)यांच्या बहुजन विकास पक्षाकडे 3 मते आहेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून जास्त जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या चार नेत्यांच्या शिष्ठमंडळाने रविवारी त्यांची भेट घेतली होती, त्यानंतर सोमवारी भाजपा नेते गिरीश महाजन हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला दाखल झाले.
एका अलिशान गाडीतून अतिशय गोपनीय पद्धतीने गिरीश महाजन हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला आले. दोन तासांहून जास्त काळ हितेंद्र ठाकूर आणि महाजन यांची भेट सुरु होती. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला मत द्यावे, यासाठी महाजनांनी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने ही राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून ज्या तीन नेत्यांकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यात गिरीश महाजनांचा समावेश आहे. महाजन यांच्याकडे अपक्ष आणि छोट्या पक्षांची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे महाजन आणि ठाकूर यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. त्यापूर्वी शनिवारीही भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडीक हेही आले होते. त्यांनी ही ठाकूरांची भेट घेतली होती.
रविवारी शिवसेनेचे शिष्ठमंडळ हितेंद्र ठाकूर यांच्या भएटीला आले होते. यात खासदार राजन विचारे, संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्यासह अजून दोन नेत्यांचा समावेश होता. सुमारे चार तास हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना नेत्यांची ही भेट सुरु होती.
शिवसेना-भाजपा नेत्यांची भेट झाल्यानंतरही या राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार याची भूमिका अद्याप पर्यंत हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलेली नाही. मतदानाच्या दिवशीच मतदानातून भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते सांगातायेत. त्यांच्यासारखीच भूमिका अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत कोम जिंकणार, हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहील असे सध्यातरी दिसते आहे.