‘तू तुझी लंगोट सांभाळ, मग आमच्या लंगोटीला हात घाल’, रामदास कदम यांचं अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Jun 20, 2024 | 6:13 PM

"रायगडमधून धैर्यशील पाटीलला भाजप लढवण्याची तयारी करत होती. तटकरेंना जागा मिळवून देण्यासाठी आम्ही काय केलं विचारा. तू तुझी लगोंट सांभाळ. मग आमच्या लंगोटीला हात घाल", अशा शब्दांत रामदास कदम यांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

तू तुझी लंगोट सांभाळ, मग आमच्या लंगोटीला हात घाल, रामदास कदम यांचं अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
रामदास कदम यांचं अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
Follow us on

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीवर उघडपणे भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपवने सर्व्हेचं कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यास भाग पाडलं. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपचे केवळ 9 खासदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आले. कमी जागांवर निवडणूक लढवूनही 7 जागा निवडून आणल्या. याच मुद्द्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यावर आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“हमाम में सब नंगे होते है. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची जागा कुणामुळे आली त्यांना विचारा. तटकरेंना मी निवडून आणलेलं आहे. रायगडमधून धैर्यशील पाटीलला भाजप लढवण्याची तयारी करत होती. तटकरेंना जागा मिळवून देण्यासाठी आम्ही काय केलं विचारा. तू तुझी लगोंट सांभाळ. मग आमच्या लंगोटीला हात घाल”, अशा शब्दांत रामदास कदम यांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “मला महायुतीत मिठाचा खडा टाकायचा नाही. अजितदादा एक चांगले व्यक्तीमत्व आहेत. सकाळी 6 वाजता उठून काम करणारा व्यक्ती आहे. थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं. आम्हाला मंत्रीपदं मिळाली असती”, असं रामदास कदम म्हणाले.

‘तुम्ही सर्व्हे केला, मग तुमच्या जागा गेल्या कुठे?’

“भाजपच्या वरिष्ठांच्या 15 जागा सोडण्यात आल्या. 18 जागा आमच्या विजयी झालेल्या होत्या. जेवढ्या लढल्या तेवढ्या जागा मिळाल्या. दोन महिन्याआधी डिक्लेअर झालं असतं तर 13 ते 14 जागा आमच्या आल्या असत्या. नाशिकला मंत्री छगन भुजबळ बाशिंग बांधून बसले होते. आमचे सिटींग खासदार हटवल्यामुळे जागा कमी झाल्या. तीन ते चार जागा आम्हाला बदलायला लावल्या. त्यामुळे आमच्या चार ते पाच जागा गेल्या. भाजपने आपल्या जागा जाहीर करू टाकल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. तुम्ही सर्व्हे केला होता. मग तुमच्या जागा गेल्या कुठे? एकनाथ शिंदेचं नुकसान झालं. पर्यायानं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नुकसान झालं. सर्व्हेचं उत्तर भाजपला मिळालेलं आहे”, असं रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम कालच्या भाषणात नेमकं काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुकीत आपण कुठेही गाफील राहता कामा नये. एकनाथ शिंदे यांना हात जोडून एक विनंती आहे, कृपया भाजपच्या नेत्यांना सांगा, मला माहिती आहे, या विषयावर कुणी बोलणार नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे घेऊन चला. मी त्यांना सांगतो की, साहेब जसे भाजपचे दोन महिन्यांआधी उमेदवार जाहीर केले तसे शिंदेंचे उमेदवार दोन महिन्यांआधी दिले असते तर चित्र वेगळं असतं. माझी भावना ताई गवळी दिल्लीत निवडून गेली असती. माझा हेमंत पाटील दिल्लीत गेला असता. हेमंत गोडसे दिल्लीत गेला असता. पण एकनाथ शिंदे यांनी एकदा शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला की, भाजपचे नेते उठले की, आमची जागा… आमची जागा. ही भानगड काय? शिंदे साहेब… हे थांबवा. नाहीतर मला घेऊन जा. शिंदे साहेब, मोदी आणि शाह यांना सांगा, मला 100 उमेदवार द्या. आम्ही 90 उमेदवार नाही निवडून आणले तर तुम्ही सांगाल ते आम्ही करु. अजित दादा थोडे दिवस आले नसते तरी चाललं असतं. आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती”, असं शल्य रामदास कदम यांनी व्यक्त केलं.