विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच ज्या इच्छूक उमेदवारांना तिकीट मिळणार नाही त्यांची बंडखोरी रोखण्याचं देखील आव्हान महायुतीतील नेत्यांसमोर असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांची महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मी आमदार झाल्यानंतर खेडमधील दंगली थांबल्या असा दावा देखील त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
अजून जागा वाटप अधिकृत झालेलं नाहीये, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जे काही जागावाटप होईल याबाबत शिवसेनेमध्ये माझ्यासह कोणाचीही नाराजी नसेल. ज्या काही जागा मिळतील त्यातील जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या यासाठी सगळे प्रयत्न करणार आहेत असं कदम यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दापोलीमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजून सांगण्याची गरज आहे. या निवडणुकांमध्ये निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरे गट असू द्यात, शरद पवार राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस यांचा नायनाट झालेला दिसेल. योगेश कदम यांच्यासमोर जो उमेदवार उभा राहील त्याचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.
तसेच आपण आमदार झाल्यानंतर खेडमधील दंगली थांबल्या असा दावा देखील कदम यांनी केला आहे. 1990 सालामध्ये तीन-तीन गाड्या एसआरपीच्या खेडमध्ये असायच्या. गणपती शिमगा आला की दंगल व्हायची. मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून दंगली थांबल्या. सर्वधर्म समभावाची शिकवण मी दिली असा दावा देखील यावेळी कदम यांनी केला आहे.