‘जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने बाळासाहेब थोरात संतापले

| Updated on: Sep 16, 2024 | 4:01 PM

शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते प्रचंड संतापले आहेत. 'जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ', असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं.

जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस, संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने बाळासाहेब थोरात संतापले
काँग्रेस नेते राहुल गांधी
Image Credit source: social media
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय गायकवाड यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. “राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केल्याने, त्यांच्या मनातलं ओठावर आलं आहे. यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली आहे. आपण मागासवर्गीय आणि ओबीसींचे हाल पाहत आहोत. आज त्या समाजाला आपल्यासोबत आणायची गरज आहे. त्यांचे दुःख, आणि आत्मीयता यातून हे स्टेटमेंट केले”, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं आहे.

“महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे. ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही. राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणात नाही, काँग्रेसचे कोट्यवधी कार्यकर्ते राहुल गांधींची ढाल आहेत. महत्वाचे म्हणजे या देशातील सामान्य जनता राहुल गांधी यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. संजय गायकवाड या आमदाराच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यात जर कायद्याचे थोडे बहुत राज्य शिल्लक असेल तर तातडीने संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून, राज्य सरकारने अशा विषवल्लीला मुळापासून उखडून फेकले पाहिजे.

बाळासाहेब थोरात आणखी काय म्हणाले?

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. “संजय गायकवाड जे बोलले ते अत्यंत निषेधार्य आहे. यात आपल्याला जी प्रवृत्ती दिसते, ती पुरोगामी विचारांचा जनसामान्यांचा जो विचार मांडला जातोय त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही प्रवृत्तीची आहे. आम्हाला त्यात नथुराम गोडसे दिसत आहे. संजय गायकवाड फार सामान्य आहे, आमदार आहे. त्याची प्रवृत्ती ही देशाला विघातक आहे. राहुल गांधींच्या केसाला धक्का लावण्याची कोणालाही ताकद नाही आणि याचा धाक त्यांनी घेतला म्हणून असे विधान करत आहे”, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

“राहुल गांधींनी काय स्टेटमेंट केलं ते आपण पाहिलं पाहिजे. त्यांनी आरक्षणाबाबतीत केलेलं स्टेटमेंट आपण बारकाव्याने समजून घेतलं पाहिजे. भाजपा हा घाबरलेला आहे. लोकसभेच्या वेळेचे मतदान झालं आणि त्यांच्या विरोधात जनता गेली याला कारण त्यांचं वागणं आहे. त्यांच्या मनात भीती बसली आहे म्हणून आरक्षणाच्या बाजूचे आपण कसे आहोत हे सांगण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही घटना नकोय. आरक्षण नकोय. संविधानाच्या विरोधातले ते आहेत. जनसामान्य गरिबाच्या विरोधातले ते आहेत. भाजप धनदांडग्यांकरता काम करणारा पक्ष आहे. खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे आंदोलन करत सुटले आहेत. भारतातली जनता दूधखुळी नाही. असे कितीही आंदोलन केले तरी त्याचा परिणाम होणार नाही”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

‘संजय गायकवाड औकाती बाहेर…’, वडेट्टीवार यांचा घणाघात

काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “संजय गायकवाड वर गुन्ह्याची नोंद करा, कारवाई करा. संजय गायकवाड औकाती बाहेर बोलत आहे. राहुल गांधी यांचे नाव घेण्याची तुझी औकात नाही. तू कुठे आणि तुझा पक्ष कुठे आहे? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचा माज आणि मस्ती उतरेल”, असा कडक शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यशोमती ठाकूर यांची कारवाईची मागणी

आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. फेक नेरेटिव्हचे बादशाह देवेंद्र फडवणीस आहेत. फेक नेरेटिव्ह करून जीव घेण्याची भाषा जर कोणी अडानी करत असेल तर जनता त्याला माफ करणार नाही. त्यावर कारवाई झाली पाहिजे. संजय गायकवाड यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. उद्या महाविकास आघाडीची सत्ता येते आहे तर राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.