चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

| Updated on: Oct 22, 2021 | 11:04 AM

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर
संजय राऊत, शिवसेना नेते.
Follow us on

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्त्यव्य पूर्वी चांगलेच गाजले. त्यावरून नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेना कार्यकर्त्यांची पाठ थोपटली. आता या साऱ्या घडामोडीनंतर राऊत शुक्रवारी रात्री नाशिक मुक्कामी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या शनिवारी शाखाप्रमुख आणि बुथ प्रमुखांचा मेळावा होणार आहे. सोबतच शिवसेनेच्या नगरसेवकांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि काही कामांचे लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात राऊत जिल्ह्याती काही तालुक्यांना भेटी देणार आहेत आणि लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवाय ते आपल्या स्टाइलमध्ये भाजपला उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा कार्यकारिणी अनेक फेरबदल केले. त्यानंतर आता संजय राऊत यांचा दौरा आहे. हा दौराही गाजण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीत महापालिका निवडणूक

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. भाजपच्या या विजयश्रीची विरोधकांनी धास्ती घेतली होती. त्यामुळेच नाशिकमध्ये शिवसेना आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने बहुसदस्यीय ऐवजी द्विसदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली होती. मात्र, आता तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. याचा फायदा कोणाला होणार, हे येणारा काळच सांगेल.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3

इतर बातम्याः

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी

मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्याचे आवाहन; नाशिककरांच्या मदतीसाठी संकेतस्थळासह टोल फ्री क्रमांक