‘महाराष्ट्राच्या राजकारणात महिन्याभरात मोठा भूकंप’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

| Updated on: Jan 10, 2025 | 6:27 PM

शिवसेनेच्या बड्या नेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सर्वात मोठा दावा केला आहे. महायुती सरकारमध्ये महाविकास आघाडीमधील आणखी एक पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याचं भाकीत या नेत्याने वर्तवलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात महिन्याभरात मोठा भूकंप, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
महाराष्ट्र राजकारण (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा मुद्दा मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, थेट सत्तेत सहभागी व्हावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात पक्ष विलीन करुन सत्तेत सहभागी व्हावं, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बातम्या ताज्या असतानाच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या महिन्याभरात मोठा भूकंप होणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्याभरात भूकंप होईल, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. शरद पवार गट महाविकास आघाडीत राहणार नाही, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

मंत्री संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

“खासदार संजय राऊत यांनी मिठाचा खडा टाकला. त्यामुळे आता महाविकास आघाडीदेखील आता राहणार नाही. काँग्रेसला तर मुळात त्यांची गरजच नाही. शरद पवारांची भूमिका आपण दिवसेंदिवस बदलताना पाहतोय. याचा अर्थ असा होतो की, आपल्याला सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय जे राहू शकत नाहीत, असे पुन्हा मन परिवर्तन होऊन युतीच्या बरोबर येण्याचा किंवा उपमुख्यनमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. तो त्याच पद्धतीने या महिन्याभरात दिसून येईल”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर आता महिन्याभरात खरंच तशा घडामोडी घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा