‘राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जावून बाबासाहेबांची माफी मागावी तरच…’, संजय गायकवाड यांचं नवं वक्तव्य

| Updated on: Sep 18, 2024 | 3:22 PM

संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी आणखी नवं वक्तव्य केलं आहे. "राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जावून डोकं टेकवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी", अशी मागणी संजय गायकवाड यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जावून बाबासाहेबांची माफी मागावी तरच..., संजय गायकवाड यांचं नवं वक्तव्य
संजय गायकवाड आणि राहुल गांधी
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीत आरक्षणाबाबत केलेल्या एका वक्तव्याचा धागा पकडत संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणावरुन राज्यभरात वातावरण तापल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आणखी एक नवं वक्तव्य केलं आहे. “जो राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार”, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. या वक्तव्यावर वाद उफाळल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपण आपले शब्द मागे घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. “राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं त्यावरुन त्यांनी चैत्यभूमीवर जावून माथा टेकून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी:, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे. “राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जावून माफी मागावी. राहुल गांधी यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“मी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर मी आज दुसरी घोषणा करतो, राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे. संपूर्ण देशाच्या पीडित समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमी जावून तिथे माथा टेकावं किंवा नागपूरच्या दीक्षाभूमिवर माथा टेकावं, आणि बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी माफी मागावी. त्यांनी तसं केलं तर मी जी घोषणा केली आहे की, त्याबाबत माझे शब्द मी मागे घेईन”, अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी मांडली.

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन

संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसकडून राज्यभरात ठिकठिकाणी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय. साताऱ्यात काँग्रेस कमिटी समोर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्य प्रकरणी कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे आणि पदाधिकारी यांनी देखील आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात चेंबूर आंबेडकर गार्डन जवळ आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले.