संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांची वाशिममध्ये गुप्त बैठक, पडद्यामागे मोठं काहीतरी घडतंय?

| Updated on: Apr 02, 2024 | 4:53 PM

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल तेव्हा सुटेल, पण तिकडे हिंगोलीत आता महायुतीत मनोमिलन होत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणारे आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांची आज गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांची वाशिममध्ये गुप्त बैठक, पडद्यामागे मोठं काहीतरी घडतंय?
संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांची वाशिममध्ये गुप्त बैठक
Follow us on

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात वाशिममध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हिंगोलीत सध्या महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे हिंगोलीत महायुतीत उमेदवारीवरुन मतभेद असल्याचं स्पष्ट आहे. असं असताना आता महायुतीकडून या मतदारसंघाचा संयमाने विषय हाताळण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत असल्याची चर्चा आहे.

भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या विरोधामुळे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहेत. पण शिवसेना आमदार संतोष बांगर हे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. विशेष म्हणजे संतोष बांगर यांनी आज हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची भेट घेतली आहे. दोघांची भेट वाशिममध्ये झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या बैठकीनंतर तानाजी मुटकुळे यांनी कौटुंबिक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया दिली. तर आमदार संतोष बांगर यांनी या बैठकीत नेमकं काय ठरलं? या विषयी बोलणं टाळलं.

बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? मुटकुळे म्हणाले…

“संतोष बांगर हे आमचे मित्र असून आज ते वाशिममध्ये असल्याची माहिती मिळाली. मी अकोल्यावरून येत असताना राठी बाजार या ठिकाणी त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कौटुंबिक चर्चा झाली. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही”, अशी प्रतिक्रिया तानाजी मुटकुळे यांनी दिली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेची आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. मात्र ही जागा भाजपकडे असावी अशी आमची मागणी होती”, अशी भूमिका मुटकुळे यांनी मांडली.

‘हिंगोलीची जागा शिवसेनेकडे राहणार’

“हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते मुंबईला जात असल्याबाबत मला कुणीही माहिती दिली नाही. कोणत्याही शिवसैनिकाचा मला फोन आलेला नाही. शिवसैनिक मुंबईला जात नसतील. उमेदवारी बदलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. त्यांना याबाबत काही वाटत असेल तर ते योग्य निर्णय घेतील. हिंगोलीच्या जागेवर शिवसेना-भाजपच वर्चस्व आहे. त्यामुळे ही जागा त्यांना भेटावी, असं त्यांना वाटत होतं. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला शब्द दिला होता. ही उमेदवारी शिवसेनेकडे राहणार आहे. त्यानुसार हेमंत पाटील हे उमेदवार आहेत”, अशी प्रतिक्रया मुटकुळे यांनी दिली.

संतोष बांगर काय म्हणाले?

आमदार संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्या भेटीवर जास्त बोलणं टाळलं. “मुटकुळे यांच्यासोबत फक्त चहापाण्याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर ते रवाना झाले. जे उमेदवार आणि आदेश पक्षश्रेष्ठी देतात त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करतो”, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली.