मुंबईः राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही अपक्षांना पाठीबा देणार नाहीत. मग तो कुणीही असो. अशी भूमिका आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केली. मात्र राज्यसभेच्या जागेवर अपक्ष म्हणून उभे राहणाऱ्या संभाजीराजेंना (Sambhaji Raje) शिवसेनेचा (ShivSena) विरोध आहे का, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत पत्रकारांवर चांगलेच भडकले. आम्ही विरोध करत नाहीत तर आमच्याकडून एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही त्यांना शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. आमच्या राज्यसभेवर दोन जागा निवडून येतील. तिथे आमच्याकडून विरोध कसा, असा सवाल संजय राऊतांनी केला. एकूण संभाजीराजेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेला मराठा राजकारणाची भीती सतावत आहे, असेच चित्र आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी शिवसेना दुसरा उमेदवार देणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. राऊत शिवसेनेची भूमिका मांडत असतानाच शिवसेनेचा संभाजीराजेंना विरोध आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत चांगलेच भडकले. विरोध कसला? आधी विरोध शब्द मागे घ्या. विरोध कसा काय? शब्द जपून वापरा. विरोध नाही. आमच्या जागा आहेत विरोध कसा काय? उलट आमच्याकडून एक पाऊल पुढे टाकलं जात आहे. आमच्या दोन जागा निवडून येतील. तिथे कुणाला विरोध करावा आणि कुणाला पाठिंबा द्यायचा नाही, असं राऊत म्हणाले.
संभाजी राजेंनी राज्यसभेवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर शिवसेना अपक्षांना पाठिंबा देणार नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. राज्यसभेच्या एका जागेसाठी संभाजीराजे निवडणूक लढवणार आहेत. मात्र आज संभाजी राजे यांना शिवसेनेनं मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हा प्रस्ताव संभाजीराजे फेटाळला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं. ज्या अर्थी एखादा उमेदवार मी लढणार असे जाहीरपणे सांगतो तेव्हा मला वाटतं तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. त्यामुळे शिवसेनेच्या हातून ही जागा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात संभाजी राजेंमागील मराठा संघटनांचा जनाधार पाहता शिवसेनेच्या हातून ही मतं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय राऊतांनी मीडियाशी संवाद शाधला, त्यावेळी त्यांनी शिवसेना आपल्या भूमिकेविषयी ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीराजेंचा प्रस्ताव आपल्याला आला नव्हता. तसेच शिवसेना दोन जागा लढवणार आहे. गेली अनेक वर्षे पक्ष राजकारणात आहे. त्यामुळे दोन जागा लढवणं हा राजकीय अपराध नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं.
छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन सुरु केलं असून याविषयावर त्यांनी अनेकदा पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकाही घेतल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजात ते चांगलेच लोकप्रिय आहेत. अशा वेळी शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारल्यास किंवा त्यांना पाठिंबा न दिल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. विधानसभा निवडणुकांच्या वेळी शिवसेनेला हे जास्त महागात पडू शकतं. त्यामुळे संभाजीराजेंना विरोध शिवसेनेला परवडणारं नाही.