महायुतीच्या जागावाटपावर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 08, 2024 | 10:45 PM

विधानसभा निवडणुकीचं बिगूल कधीही वाजू शकतं. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगाने हालचाली सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. असं असताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जागावाटपावर मोठं वक्तव्य केलं आहे.

महायुतीच्या जागावाटपावर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं मोठं वक्तव्य
श्रीकांत शिंदे
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत आहेत. नेतेमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाचा उमेदवार जिंकून यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे काही मतदारसंघांवर महायुती आणि मविआत रस्सीखेच सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून काही मतदारसंघांवर दावा केला जातोय. महायुतीतही काही जागांवर तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. पण असं असलं तरी विरोधकांचा पराभव करायचा असेल तर मित्रपक्षांसोबत चर्चेतून मार्ग काढणं हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

श्रीकांत शिंदे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जागावाटपाबाबत भाष्य केलं. “कार्यकर्त्यांची इच्छा असते, प्रत्येक विधानसभा त्या-त्या पक्षाला सुटली पाहिजे. कार्यकर्त्यांची इच्छा आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. परभणी, पाथरी, गंगाखेड याबबतची चांगली बातमी लवकरच दिली जाईल. मात्र युतीमध्ये लढत असताना सहकाऱ्यांचाही विचार करावा लागतो”, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेची उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीत धुसफूस बघायला मिळाली होती. आता श्रीकांत शिंदे यांनी परभणी, पाथरी, गंगाखेड या मतदारसंघांबाबत भाष्य केल्याने महायुतीचे इतर नेते काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हरियाणा निवडणूक निकालावर श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

श्रीकांत शिंदे यांनी यावेळी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. “हरियाणा विधानसभेचा निकाल काँग्रेससाठी आय ओपनर आहे. काँग्रेसने जातीचं आणि धर्माचं राजकारण केलं. काँग्रेसने फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं. ते केवळ लोकसभेमध्ये चाललं. त्याला उचलून फेकण्याचं काम हरियाणाच्या जनतेने केलं आहे. महाराष्ट्राची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला येत्या दीड महिन्यात त्यांची जागा दाखवून देईल”, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.

‘कार्यकर्त्यांनी त्याच्यात न पडलेलं बरं’

यावेळी श्रीकांत शिंदे यांना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी “या सगळ्या गोष्टी मोठ्या लोकांच्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्याच्यात न पडलेलं बरं. एकनाथ शिंदे का बाहेर पडले याचे उत्तर त्यांनी अनेकवेळा दिलेलं आहे. आता आपण त्याच्या खूप पुढे निघालेलो आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. शिंदे यांच्यावरती प्रेम करणारी जनता आहे. सहा-सहा तास उशीर झाला तरी लोकांमध्ये उत्साह आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.