कोल्हापूर | 16 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचा आज पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. “मी शिंदे साहेबांना जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला लहानपणाचा एकही असा सण आठवत नाही की ज्या सणाच्या दिवशी माझे वडील माझ्यासोबत घरी सण साजरा केला किंवा दिवस व्यथित केला. ते सतत लोकांमध्ये असायचे. त्यामुळे आम्ही आधी त्यांच्याबद्दल खूप तक्रारी करायचो की, आमच्यासाठी कधी वेळ देणार? त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसायचं. आम्हाला कधी….”, असं बोलल्यानंतर श्रीकांत शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. यावेळी संपूर्ण सभेत शांतता पसरली. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
“मला माझ्या बापाचा अभिमान आहे. ज्या बापाने या सर्व शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं म्हणून हा साधारण शिवसैनिक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. “आज भरपूर लोकं माझा बाप चोरला म्हणून म्हणत आहेत. रोज उठलं की बाप चोरला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकाचे वैयक्तिक मालमत्ता नाही. या महाराष्ट्रात एकच बाप होऊन गेला. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे”, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, शिवसेनेच्या महामेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत. “आमचे पहिले पक्षाचे अधिवेशन आज पार पडले. आम्ही राज्य आणि राष्ट्रातील महिलांसाठीच्या प्रगती, विकास योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्प योजनांवर चर्चा केली. आम्ही पीएम नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा आणि राम मंदिराच्या अभिषेकासाठी अभिनंदन करणारा ठराव समंत केला. आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन 48 जागा मिळवण्याचं वचन दिलं”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाअधिवेशनानंतर दिली. तर “लोकसभेच्या जागा वाटपाचा अधिकार एकनाथ शिंदेना देण्याता आला”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच “लोकसभेच्या निवडणुकीत 48 जागा जिंकण्याची आम्ही शपथ घेतली आहे. महाअधिवेशनात लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आम्ही 400 पारचा नारा देणार आहोत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा महत्त्वाच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी महाअधिवेशनानंतर दिली.