मुंबई : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळी पाऊस अन् गारपीटीचं थैमान माजलं असताना संपूर्ण सरकार तितडे अयोध्येत (Ayodhya) उत्सवात अडकून पडले आहे. हे रामराज्याचे चित्र नाही . श्रीराम हे दयाळू , प्रजादक्ष राजे होते . ते प्रजेचे पालनहार होते . आज जे अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करीत आहेत , त्यांच्या तोंडात राम , पण बगलेत खंजीर आहे . श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे पाप धुतले जाईल का, असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समर्थकांच्या अयोध्या दौऱ्यावरून सणसणीत सवाल करण्यात आलाय. या दौऱ्यातून यांची पापं धुतली जातील का ते माहिती नाही, पण त्यांना सुबुद्धी मिळो व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर होणारे रावणी हल्ले परतवून लावण्याचे बळ मिळो,असं वक्तव्य अग्रलेखातून करण्यात आलंय.
हिंदुत्व ठसवण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर फक्त शिंदेंचा गटच गेला नाही, तर ठाकरेंची शिवसेनादेखील अनेकवेळा गेली आहे, याचं स्पष्टीकरणही सामनाच्या आग्रलेखातून देण्यात आलंय. त्यात लिहिलंय, गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना व मंत्र्यांना अयोध्या किंवा प्रभू श्रीरामांची आठवण आली नाही. गेल्या पाचेक वर्षांत आम्ही अयोध्येत हजारो शिवसैनिकांसह तीन-चार वेळा जाऊन आलो. शरयूतीरी आरती, दर्शन, अयोध्येतील साधुसंतांचे संमेलन असे अनेक धार्मिक सोहळे पार पडले व सोबत आजचे मिंधे व त्यांची टोळीसुद्धा होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर अयोध्या नगरीचे विशेष प्रेम आहे. श्रीरामांच्या सुटकेसाठी व अस्मितेसाठी जो लढा झाला, त्यात शिवसेनाप्रमुखांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे शिवसेनेचे अयोध्येशी एक भावनिक नाते आहे. ते नक्कीच राहील. आता जे लोक अयोध्येत जाऊन नकली शिवसेनेचा जयजयकार करत आहेत ते ढोंग व खोक्यांतून निर्माण झालेला अहंकार आहे, असा आरोपही करण्यात आलाय.
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात काही आमदार सहभागी झाले नाहीत. त्यावरून शिवसेनेने प्रश्न उपस्थित केलाय. अयोध्या दौऱ्यावर काही आमदार न जाणं हा शिंदे गटात ठिणगी पडण्याचा प्रकार आहे का, असा सवाल करण्यात आलाय.
अयोध्येतील शिंदे गटाचा हा उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ, हे येणारा काळच ठरवेल, असा इशाराही देण्यात आलाय. बेईमानांसाठी पायघड्या घालणे, ही भाजपची संस्कृतीच आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या दौऱ्याची चोख व्यवस्था केली, अशा शब्दात सामनातून ताशेरे ओढण्यात आलेत.
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांनी पळवल्याचा आरोप शिवसेनेने वारंवार केलाय. कालच्या अयोध्या दौऱ्यात धनुष्यबाणाची विशेष पूजा करण्यात आली. त्यावरून सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे. श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे पाप धुतले जाईल की नाही ते माहीत नाही, पण त्यांना सुबुद्धी मिळो व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर होणारे रावणी हल्ले परतवून लावण्याचे बळ मिळो! अर्थात गुडघे टेकणाऱ्या मिंध्यांकडून ही अपेक्षा करणे चूकच आहे. चोरलेल्या धनुष्याने शौर्य गाजवता येत नाही, असा टोमणा सामनातून मारण्यात आलाय.