‘जो लायक असेल त्याला संधी मिळेल’, संजय शिरसाट यांनी आपल्याच पक्षाच्या कोणत्या नेत्यांची उडवली झोप?

| Updated on: Nov 25, 2024 | 9:22 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तरीही, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची घोषणा लांबणीवर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीत मंत्रिमंडळाची रचना आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत मंत्रिपदाच्या आशेवर अनेक आमदार बसले आहेत. असं असताना संजय शिरसाट यांनी लायक असेल त्यालाच संधी मिळेल, असं वक्तव्य केलं आहे.

जो लायक असेल त्याला संधी मिळेल, संजय शिरसाट यांनी आपल्याच पक्षाच्या कोणत्या नेत्यांची उडवली झोप?
संजय शिरसाट
Image Credit source: social media
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. असं असलं तरीदेखील महायुतीचं काही ठरताना दिसत नाही. महायुतीला 230 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचा कारभार अतिशय निवांतपणे सुरु आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल? ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय पहिला शपथविधी कधी होईल? आणि त्या शपथविधीच्या कार्यक्रमावेळी कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार? जुनेच मंत्री शपथ घेणार की नव्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार? याबाबतच्या प्रश्नांचं उत्तर निकाल लागल्यानंतर दोन दिवस उलटल्यानंतरही समोर येताना दिसत नाहीय. असं असलं तरी पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रिमंडळात कुणाला किती जागा द्यायच्या, याच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री कोण होणार? ते देखील ठरणार असल्याची चर्चा आहे.

अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर घडून आलं तेव्हा शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा होती. पण अनेकांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे त्यावेळी अनेकांनी आपली नाराजी कॅमेऱ्यासमोर जाहीरपणे बोलून दाखवली देखील होती. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी तर मंत्रिपद मिळेल या आशेवर कोट देखील शिवून घेतला होता. पण त्यांना मंत्रिपद मिळालंच नाही. पण आता निवडणुकीनंतर आपल्याला शंभर टक्के मंत्रिपद मिळेल, असा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य हे भरत गोगावले यांना टोला तर नाही ना? अशी चर्चा आहे.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

“कुणीही मुख्यमंत्री झालं तरी स्वागतच आहे. भाजपचा गटनेता निवडला गेला नाहीय. आमचा आणि एनसीपीचा निवडला गेलाय. याला दोन दिवस अजून लागणार आहेत. यानंतर एकनाथ शिंदे आणि दोन्ही प्रमुख नेते दिल्लीला जातील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार, तिथे मुख्यमंत्री कोण हे ठरणार. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल आणि मुख्यमंत्री कोण या नावाची घोषणा होणार”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

यावेळी संजय शिरसाट यांना मंत्रिपदाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे, जे जुने मंत्री आहेत त्यांच्याजागी नव्यांना संधी दिली जाणार आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, जो लायक असेल त्याला संधी मिळेल”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. शिरसाट यांचं हे वक्तव्य नेमकं कुणाला टोला आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेत मंत्रिपदाची आशा धरुन बसलेल्या आशावादी आमदारांना यावेळेलादेखील मंत्रिपद मिळणार नाही, असा याचा अर्थ होतो का? असा प्रश्न त्यांच्या वक्तव्याने निर्माण होतोय.