नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार दोन्ही गटांनी आपलं लेखी म्हणणं निवडणूक आयोगात सादर केलंय. दरम्यान, शिंदे गटाने मांडलेल्या लेखी भूमिकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय. संजय राऊत यांच्या धमकीमुळे आमदार पळून गेले, असा धक्कादायक दावा शिंदे गटाने लेखी युक्तिवादात केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाच्या लेखी युक्तिवादात संजय राऊत यांचा उल्लेख करण्यात आलाय. “शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला. संजय राऊत यांच्या धमकीची दखल घेत सुप्रीम कोर्टाने सुरक्षा पुरवण्यास सांगितलं होतं”, असा उल्लेख लेखी युक्तिवादात करण्यात आलाय.
“संजय राऊत यांनी धमकी दिल्यामुळे आमचे आमदार पळून गेले. पक्षात फूट पडल्याने शिंदे गटाचे आमदार आणि त्यांच्या कुटुंबीय यांना धोका निर्माण झाला, याची दखल माध्यमांनीही घेतली होती”, असा दावा लेखी युक्तिवादात करण्यात आलाय.
“या धमकीची दखल घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदार आणि कुटुंबियांना सुरक्षा पुरवावी असे सरकाराल सांगितलं होतं”, असं शिंदे गटाच्या लेखी युक्तिवादात म्हटलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून आज केंद्रीय निवडणूक आयोगात तब्बल 124 पानांचं लेखी उत्तर सादर करण्यात आलं आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
“ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना आमच्याकडून लेखी स्वरुपात उत्तर देण्यात आलंय. आता दोन्ही बाजूंचा लेखी स्वरुपातील युक्तिवादाचा अभ्यास करुन निवडणूक आयोग निर्णय घोषित करतील”, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.
“आमच्या युक्तिवादात याच गोष्टीवर भर दिला गेलाय की, शिवसेनेच्या घटनेविषयी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय”, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.
“पक्षाची मान्यता मतदानावर अवलंबून असते. त्यामुळे मतदान हे आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींवर अवलंबून असते. ज्यांकडे मतदान जास्त त्यांचं मतदान गृहित धरलं जातं. त्यानुसार पक्षाची मान्यता गृहित धरली जाते. असे सगळे मुद्दे आम्ही निवडणूक आयोगात मांडले आहेत’, अशी माहिती शेवाळेंनी दिली.
“एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद हे घटनात्मक आहे. ही बाजू आम्ही संपूर्णत: निवडणूक आयोगासमोर मांडलेली आहे. संविधानानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जी प्रक्रिया आहे, ती पार पाडून, त्याची अंमलबजावणी करुन घटनात्मक ते पद निर्माण करण्यात आलं आहे. ही सर्व कायदेशीर बाजू आम्ही निवडणूक आयोगाकडे मांडलेली आहे”, असा दावा त्यांनी केला.
“शिवसेना पक्षाच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण यांना माहिती नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली घटना ही वेगळी होती. तर उद्धव ठाकरेंनी तयार केलेली घटना ही वेगळी होती. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हाती घेतली तेव्हा घटना बदलण्यात आली होती. त्यावेळची घटना वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची घटना ही बाळासाहेबांच्या घटनेनुसार तयार केलेली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या घटनेला मानतो. त्यामुळे त्यानुसार आम्ही सर्व सबमिशन केलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.