सोनंनाणं, 5 घरे आणि विदेशी बनावटीचे पिस्तूल, संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची मालमत्ता

| Updated on: Apr 23, 2024 | 9:17 PM

संजोग वाघेरे यांच्या नावावर एकही वाहन नसल्याची नोंद आहे. त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, वाघेरे यांच्याकडे 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर 2 कोटी 98 लाख 32 हजारांचे कर्ज आहे.

सोनंनाणं, 5 घरे आणि विदेशी बनावटीचे पिस्तूल, संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची मालमत्ता
शिवसेना ठाकरे गटाचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची मालमत्ता
Follow us on

राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतंच 19 एप्रिलला पार पडलं आहे. त्यानंतर आता 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडत आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यासाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात असताना प्रतिज्ञापत्रही जोडलं जात आहे. या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांना त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर किती संपत्ती आहे, रोख रक्कम किती आहे, तसेच किती गुन्हे दाखल आहेत? याची माहिती दिली जात आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना याबाबतची माहिती देणं अनिवार्य आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मालमत्तेविषयी माहिती जनतेला देखील माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेर यांनी आज (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांची 18 कोटी 44 लाखांची मालमत्ता आहे. तर त्यांच्यावर 2 कोटी 98 लाख 32 हजारांचे कर्ज आहे. संजोग वाघेरे यांच्या नावावर एकही वाहन नसल्याची नोंद आहे. त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, वाघेरे यांच्याकडे 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर 2 कोटी 98 लाख 32 हजारांचे कर्ज आहे. वाघेरे यांच्याकडे 4 कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

वाघेर यांच्याकडे किती रुपयांचे दागिने?

संजोग वाघेरे यांच्याकडे 6 कोटी 85 लाख रुपयांची स्थावर तर त्यांच्या पत्नीकडे 5 कोटी 20 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, अशी एकूण त्यांच्याकडे 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे 351 ग्रॅम वजनाचे 21 लाख 76 हजार 571 रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे एक लाख 54 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. या दोघांनी एका सहकारी बँकेमध्ये पाच लाख रुपयांची फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवलेली आहे.

एक विदेशी बनावटीचे पिस्तूल

दरम्यान, वाघेरे यांना 64 लाख 48 हजार 271 रुपयांचे देणे आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघिरे यांना दोन कोटी 33 लाख 84 हजार रुपयांचे देणे आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे 50 हजार 490 रुपयांचे विदेशी बनावटीचे पिस्तूल आहे. वाघेरे यांच्याकडे वाकड मध्ये एक तर पिंपरीमध्ये चार अशा पाच निवासी मालमत्ता आहेत. वाघेरे पती-पत्नींनी आपले उत्पन्नाचे साधन व्यवसाय दाखविले आहे.

संजोग वाघेरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. मात्र त्यांनी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश वाघिरे यांना एक कोटी 24 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी “शुभम उद्योग” या उद्योग समूहाला एक कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. यांच्यासह अकरा जणांना संजोग वाघेरे यांनी कर्ज दिले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे संजोग वाघेरे यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये दोन तर लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलना संदर्भात एक गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.