शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परभणीत जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेला प्रत्युत्तर देत निशाणा साधला. “एखाद्या कुटुंबावर अन्याय झाल्यानंतर त्यांच्याकडे संवेदना व्यक्त करणे, आधार देणे याला कोण राजकारण आणि पर्यटन म्हणत असेल तर हे दिवाळखोरीचा आणि असंवेदनशीलतेचा हा पुरावा आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे गृहमंत्र्यांचे काम आहे”, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.
“सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण झाली हे दिसून येते. त्यांच्या शरीरावरचे वळ खोटं बोलू शकत नाही. दगड फोडून त्या तीनही भावंडांना शिक्षण देण्याचे काम त्यांच्या आई-वडिलांनी केलं. तो लॉचा विद्यार्थी होता आणि पीएचडीमध्ये सुद्धा प्रवेश झाला होता. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलीस असं कृत्य करत असतील तर काय म्हणावं?”, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केला.
“बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये निर्घृण हत्या झाली. त्याचे भाऊ सांगत होते, अपहरण झालं. पोलिसांनी त्याला शोधण्याऐवजी निष्क्रियता दाखवली. परभणीच्या घटनेतील मुलगा त्यावर तर एनसी सुद्धा नव्हती. मी राजकीय बोलणार नाही. मात्र प्रशासन म्हणून काही चूक झाली तर मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे, आणि दोषींवर कारवाई करायला पाहिजे. सुज्ञ राजकारणी म्हणून जबाबदारी आहे ती पार पाडावी. सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर निश्चितपणे परभणीचे खासदार आणि मी, सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार. सोमनाथ माझ्या मतदारसंघाचा होता. पोट भरण्यासाठी तो तिकडे गेला होता”, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.