नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर दिल्लीत उद्या फार महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) उद्या महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना (Shiv Sena) तसेच धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत फैसला होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे सुनावणीच्या आधीच ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपआपल्या विजयाचा दावा सुरु करण्यात आलाय. त्यामुळे धनुष्यबाण कोणाला मिळतं आणि शिवसेना हे नाव कुणाच्या वाट्याला येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे या दोघांसाठी ही सुनावणी फार महत्त्वाची आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची भूमिका ऐकून घेतली होती. आता उद्याच्या सुनावणी ठाकरे गट आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्ष कोणाचा? आणि धनुष्यबाण चिन्हं कोणाला मिळणार? याचा फैसला मंगळवारीच (16 जानेवारी) होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगासमोर सध्या 2 बाबी आहेत. त्यापैकी एकाचा निकाल निवडणूक आयोग देण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपतेय. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगीची मागणी आयोगाकडे करण्यात आलीय.
संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यायची का? की थेट धनुष्यबाणाचा निर्णय द्यायचा याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. पण उद्धव ठाकरेंना संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी दिली तर ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदासाठी मुदतवाढ किंवा धनुष्यबाण तसेच शिवसेना या पक्षावरुन निकाल येण्याचीच शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, शिवसेनेत उभी फूट पडली. पण संख्याबळ आमच्याकडेच असून, आम्हीच शिवसेना असा दावा शिंदे गट करतोय.
दुसरीकडे सुप्रीम कोर्टात 16 आमदारांना अपात्र करण्याच्या मागणीवरुन सुनावणी होतेय.
निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची तसंच धनुष्यबाण कोणाचं? याची सुनावणी होतेय. आतापर्यंत ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही कागदपत्र सादर करत आपआपली भूमिका मांडलीय. आणि आपआपल्या विजयाचे दावेही सुरु झालेत.
आता प्रश्न हा आहे की संख्या बळाच्याआधारे धनुष्यबाणाचा फैसला होईल की आणखी कोणत्या बाबीच्या आधारे. कायदेतज्ज्ञांचं काय मत आहे तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही गटाच्या बाजूनं येवो, तो ऐतिहासिक आणि मोठा निर्णय असेल. अर्थात त्यात बाजी कोण मारेल, यावरुन तूर्तास तर्क वितर्कच सुरु आहेत.