महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलाच झटका बसला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला मिळून ५० जागाही मिळाल्या नाही. त्याचे खापर आता एक, दुसऱ्यावर फोडले जात आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २० तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा जागांवर थांबली. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद समोर येऊ लागले आहे. आता सोलापूरमधील ठाकरे सेनेने थेट खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढवू, असा इशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केल्यानंतरच महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू. अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवू.
खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर शिवसेना उबाठाचा पराभव झाला, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे. प्रणिती शिंदे यांच्यासारखे गद्दार लोक महाविकास आघाडीत असतील तर एकत्र लढणे अवघड आहे. महाविकास आघाडीतून खासदार प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा तसेच काँग्रेसने त्यांची खासदारकी रद्द करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केली नाही तर शिवसेना आगामी काळातील निवडणुकीत आंदोलने शिवसेनेच्या स्टाईलने करेल, असे शरद कोळी यांनी म्हटले. महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झालेला होता. मात्र उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस उभा राहिली. मात्र काही नेत्यांना पंख आले आणि ते उडायला लागले. मात्र त्यांचे पाणी किती ते आता त्यांना कळले. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून त्यांच्या काही नेत्यांनी भाजपचे काम केले. त्यापैकीच खासदार प्रणिती शिंदे या देखील आहेत. त्यामुळे अशा गद्दार लोकांची तात्काळ हकालपट्टी करावी, असे शरद कोळी यांनी म्हटले.