राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिलेदार खासदार अरविंद सावंत यांनी निशाणा साधला आहे. “अमोल कोल्हे तेव्हा राजकारणातही नव्हते तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. आम्हाला झोपेतून जागा होत नाही हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. शिवसेना ही जागीच आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी ती कायम जागीच राहील. आम्ही काय करायचंय ते अमोल कोल्हेंनी आम्हाला सांगू नये”, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी सुनावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या बैठकीत अमोल कोल्हे यांनी भाषण करताना ठाकरे गटाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन मविआत वाद निर्माण झालाय. “राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही”, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केल्याची चर्चा आहे. त्यावरच अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं.
“काँग्रेसने आम्हाला विदर्भामध्ये एकही जागा दिली नाही. आम्ही जागा मागत राहिलो तरीदेखील त्यांनी आम्हाला जागा दिली नाही. मला असं वाटतं की भविष्यामध्ये प्रत्येक पक्ष जर महाविकास आघाडीमधूनच लढत राहिला तर मग ग्राउंड लेव्हलवरती कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होईल आणि ते तयार होणार नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढेल असं चित्र सध्या तरी दिसतंय”, असं मोठं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं.
“रंग बदलणारे आदित्य ठाकरे नाहीत तर रंग बदलण्याचा जे आरोप करतात तेच आहेत. त्यांनी रंग बदललाय. आमचा रंग हा भगवाच होता आणि भगवाच आहे. त्यांचा कुठला रंग आहे हे त्यांनी सांगावा”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं. “टीका कोण करत नाही? टीका प्रत्येक जण एकमेकांवर करत असतो. पण जनतेच्या विकास कामांसाठी भेटणं हे काय गैर नाही. पोलीस हाऊसिंगचा विषय फार मोठा आहे आणि जर त्यांना न्याय मिळत नसेल तर मग करायचं काय?”, असंही अरविंद सावंत म्हणाले.
“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वाल्मिक कराड याची पाठराखण करतात का? असा आमचा सवाल आहे. राज्यात गुन्हेगारी फोफावली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर आरोप करतात हे फार गंभीर आहे. हे महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि याकडे जनतेने आता लक्ष देणे गरजेचे आहे”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.