मुंबई : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक टीका टिप्पणी आता फिल्मी स्टाईलनं सुरु झालीय. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला. त्यानंतर भाजपकडून पलटवारातून असरानी ते मिस्टर इंडियापर्यंत उल्लेख करण्यात आलाय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला. मोगॅम्बोच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, अशी जळजळीत टीका ठाकरेंनी शाहांवर केली. त्यानंतर ठाकरेंच्या मोगॅम्बो टीकेला, भाजपच्या आशिष शेलारांनी असरानी म्हणत प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरेंनी काही दिवसांआधीही, अमित शाहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला होता. मुख्यमंत्रिपदावरुन अमित शाहांनी ठाकरेंवर टीका केली होती. त्याटीकेला प्रत्युत्तर देताना, ठाकरेंनी शाहांना मोगॅम्बो म्हटलं. उद्धव ठाकरे मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. पण या कार्यक्रमातून ठाकरेंच्या टार्गेटवर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदारच होते. शिंदे गटाच्या कपाळावरच चोर असा शिक्का लागलाय अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.
शिंदेंच्या शिवसेनेसह, ठाकरेंच्या निशाण्यावर निवडणूक आयोग आहे. चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग असल्याची खिल्लीही, उद्धव ठाकरेंनी उडवली. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंना मिळालंय. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनातला राग, भाषणातून समोर येतोय.
“निवडणूक आयोग बोगसच आहे. त्याला निवडणूक चुना लगाओ आयोग का म्हणत नाही तेच कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे. निवडणूक चुनाव आयोग नाही तर चुना लावणारा आयोग आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच “आम्ही घटनातज्ज्ञांशी जे काही बोलतोय, स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत लिहिलेलं आहे की, काय केलं म्हणजे अपात्र ठरतात किंवा अपात्र ठरत नाही. सुप्रीम कोर्टात सध्या खटला सुरु आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण हे सगळं सुरु असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोमडेपणा करायची गरज नव्हती”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी रोष व्यक्त केला.
“असं कधी घडलं नव्हतं. राम विलास पासवान यांच्या पक्षातसुद्धा असा वाद झालेला आहे. तिकडे त्यांनी जे केलेलं आहे, किती वर्ष झाली वाद सुरु आहे. वाद सुरु असताना त्यांनी राम विलास पासवान यांच्या मुलाला एक चिन्ह दिलेलं आहे आणि काकाला वेगळं चिन्ह दिलं आहे. हे दोन्ही गट शांत का बसले आहेत, कारण हे दोन्ही गट भाजपसोबत आहेत. म्हणजे तुमच्या सोयीनुसार सगळं करणार असाल तर ही हुकूमशाही आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.