महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला दिसत आहे. शिवसेनेची असलेली ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. परंतु शिवसेनेकडून विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास नाशिक लोकसभेचे तिकीट मिळणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोरस्ते यांना बोलावणे आले आहे. यामुळे आता अजय बोरस्ते ठाण्याकडे रवाना झाले आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती. या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार? यासंदर्भात वेगवेगळी नावे येत होती. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावे यासाठी दोन वेळा शक्तीप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु त्यांच्या नावाला विरोध होत होता. मग राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. परंतु त्यांना ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ आणि सकल मराठा समाजाकडून उघड विरोध दर्शवला गेला. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. आता गेल्या चार दिवसांपासून अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आले. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अजय बोरस्ते यांना सेनेकडून चाल मिळाली आहे. यामुळे महायुतीचा नाशिकचा तिढा सुटला आहे.
अजय बोरस्ते यांची कारकीर्द भाजपमधून सुरु झाली. त्यांनी अभविप विद्यार्थी संघटनेत काम करत राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर भाजप युवा मोर्चात दाखल झाले. परंतु भाजपनंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली. बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेत नगरसेवक झाले. शिवसेनेचे महानगरप्रमुख, नाशिक महापालिकेत गटनेता, विरोधी पक्ष नेता या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेने बंड केले. त्यानंतर अजय बोसस्ते यांनी नाशिकमधून २२ नगरसेवक आणि हजारो शिवसैनिकांसोबत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.