पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मी एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे. शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे काम करत आहेत. त्यामुळे कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवेसनेवर अधिकार सांगू शकणार नाही. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे शिवसेना आली आहे.
संजय राऊत यांनी दोन्ही बाजुने टाईप करून ठेवले होते. त्यांच्या बाजूने निर्णय आला तर काय बोलावे आणि विरोधात निर्णय आला तर काय बोलावे हे दोन्ही स्क्रिप्ट तयार केले होते. त्यांच्या स्क्रिप्टनुसार ते बोलत आहेत. निवडूक आयोगाला त्याच्या जुन्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा लागतो. आगामी निवडणुकीत याचा नक्कीच फायदा होईल. खरी शिवसेना कोणती याची अनेक शिवसेना वाट पहात होते. ते उंबरठ्यावर होते ते आता खऱ्या शिवसेनेत येतील, असेही ते म्हणाले आहेत.