नवी दिल्लीः रावसाहेब दानवेंचं (Raosaheb Danve) राजकारण संपल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे वक्तव्य मीच केलं होतं, अशी कबूली जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिलील आहे. नवी दिल्लीत खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वैर संपवण्याचे प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून होत आहेत. पण हेच अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंबद्दल काय बोलले होते, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्तव्य केलं होतं. दोन दिवसांपूर्वी अर्जुन खोरतकरांशी झालेल्या संवादात खोतकरांनी दानवेंवर किती जहाल टीका केली होती, याबदद्ल राऊत बोलले होते. आज नवी दिल्लीत पत्रकारांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यातील दावे खरे आहेत का, असे विचारले असता खोतकरांनी त्याला दुजोरा दिला. तसेन दानवे आणि माझ्यातील वैर अद्याप संपले नसून त्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याचेही खोतकरांनी सांगितले.
शिवसेना खासदार संजय राऊतांनी आज खोतकर-दानवे वादाबद्दल वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच अर्जुन खोतकर यांच्याशी मी फोनवर बोललो. ते म्हणाले, रावसाहेब दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत उभा राहीन आणि दानवेंना घरी बसवेन… खोतकर यांचे शब्द मी सांगू शकत नाही. शिवसेनेच्या व्यासपीठावरून खोतकरांची भाषणं तुम्ही ऐका.. सध्या तरी खोतकरी शिवसेनेत आहेत. ते स्वतःहून सांगत नाहीत, तोपर्यंत सेनेत आहेत, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं.
रावसाहेब दानवेंविषयी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर अर्जुन खोतकर यांना विचारले असता त्यांनी या वक्तव्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी असं बोललो होतो, पण आठ दिवसांपूर्वी. गेली 40 वर्षे एकसंघ काम केलंय. जिल्ह्यात त्यांनी भाजप आणि मी शिवसेनेकडून जिल्हा सांभाळलाय. काही कारणाने कटूता आली होती. आता बघू ..अजूनही मी ठरवलं नाही. सहज भेट घ्यायला गेलो होतो.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर एकनाथ शिदे गटात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात खोतकर यांची बैठक झाली. त्याचा व्हिडिओदेखील चर्चेत होता. या बैठकीनंतर खोतकर एकनाथ शिंदे गटात जाण्याची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र याबाबतीत अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. जालन्याला गेल्यानंतर यावर भाष्य करेन, असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलंय.