चिपळून, रत्नागिरी, | दि. 10 मार्च 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला होता. या मेळाव्यापूर्वी भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले होते. मला तुमच्याशी काही बोलायचं, अशी भावनिक साद भास्कर जाधव यांनी घातली होती. मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील बोलण्यासाठी आपण येणार असल्याचे म्हटले होते. या भावनिक पत्रानंतर रविवारी मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणा दरम्यान भास्कर जाधव यांच्या डोळ्यात आश्रू आले. त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी विरोधकांना धडकी भरवणारे आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
विक्रांत जाधव म्हणाले की, भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्ला भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्यांच्या एखादा खालचा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे.
त्यानंतर त्यांची ही टिवटिव बंद होईल. आज तुम्ही सर्वांनी साहेबांना सांगितले पाहिजे, साहेब काही जरी झाले तरी आम्ही तुमचे कडे बनून तुमच्यासोबत राहू. हे सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवले. येत्या काळात जेव्हा वेळ पडेल तेव्हा ठाम उभे राहिले पाहिजे. तुमच्यासोबत दोन पावले मी ही पुढे राहिले, हे भास्कर जाधव यांचा पुत्र म्हणून तुम्हाला खात्री देतो, असे विक्राम जाधव यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता विक्रांत जाधव यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, तुम्हाला कमी वयात आमदार व्हायची संधी मिळाली आहे. संधी मिळते तेव्हा नम्र व्हायचं असतं.
माझ्या वडिलांची तशी शिकवण मला दिली आहे. मात्र तरीही सांगतो आमदार योगेश कदम युट्युब काढा आणि मोहित कंबोज नाव सर्च करा. आता मोहित कंबोज कुठे दिसतात का ते पहा. आपल्या तोंडाला आवर घाला आपण पहिल्यांदा निवडून आलाय. भास्कर जाधव तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत.