शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरातील पश्चिम विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा राजीनामा सादर केला आहे. राजू शिंदे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राजू शिंदे यांनी राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या सततच्या हस्तक्षेपांमुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे मी राजीनामा देत असल्याचे राजू शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राजू शिंदे यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे आणि अबांदास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आपण ही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत. परंतु मी काही कारणास्तव तसेच माजाी खासदार चंद्रकांत खैर साहेब यांच्या बद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्या सह शिवसेना पक्षाचा आणि विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो स्वीकारावा, असे राजू शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाठ यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र आता चंद्रकांत खैरे यांच्यावरील नाराजीमुळे त्यांना शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. राजू शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरात पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांना 1 लाख 6 हजार 147 मतं पडली होती. तर, संजय शिरसाठ यांना 1 लाख 22 हजार 498 मतं मिळाली होती.
दरम्यान, राजू शिंदे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आता या घडामोडींवर शिवसेना (ठाकरे गट) काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.