विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यातच आज शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांच्यासोबत तब्बल १८ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यात मुंबईतील काही शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटसंघटिका यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजना घाडी आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे शिंदे गटात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
संजना घाडी यांची दोन दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी निवड झाली होती. मुंबईतील प्रभावी नेत्या आणि माजी नगरसेविका म्हणून त्यांना ओळखले जाते. संजना घाडी यांच्यासोबतच त्यांचे पती आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. संजय घाडी आणि संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींवर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.