नवाब मलिकांवरुन अजित पवार गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण होण्याचे चिन्हं

| Updated on: Oct 19, 2024 | 9:10 PM

अजित पवारांचे आमदार नबाव मलिक यांनी पक्ष फुटीनंतर दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मलिकांना अजित पवार पुन्हा तिकीट देणार आहेत. मात्र मलिकांना भाजपनं उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोध केला आहे.

नवाब मलिकांवरुन अजित पवार गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण होण्याचे चिन्हं
Follow us on

नवाब मलिकांवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपचे पुन्हा मतभेद निर्माण होण्याचे चिन्हं आहेत. कारण भाजपकडून शेलारांनी नवाब मलिकांच्या उमेदवारीला उघड विरोध केलाय. दाऊदशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणं भाजपला मान्य नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत. सध्या ते मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून आमदार आहेत, इथून त्यांच्या कन्या सना मलिकांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांना तिकीट देऊ शकते. मात्र भाजपनं मलिकांना विरोध केलाय.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन प्रकरणात, फडणवीसांनी मलिकांवर आरोप केले होते. त्यानंतर ईडीची कारवाई झाली आणि 15 महिने मलिक जेलमध्ये होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. मात्र तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार जावून महायुती सत्तेत आली आणि अजित पवारही सत्तेत सहभागी झाले होते. तसंच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मलिकांनी अजित पवारांना साथ दिली.

महिन्याभराआधीच अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतही मलिक सहभागी झाले. मलिक अजित पवारांसोबत दिल्यानंतर फडणवीसांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंच म्हटलं होतं. आता मलिकांवरुन फडणवीसांनी नेमकी कोणती भूमिका काय होती, तेही पाहुयात.

अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांनी म्हटलंय की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरुर स्वागत करावे. मात्र आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे. मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.

भाजपच्या विशेषत: फडणवीसांच्या विरोधानंतर नवाब मलिकांना अजित पवारांनी त्यांच्या यात्रेदरम्यान सोबत घेतलं. ते स्टँडिंग आमदार असल्यानं अजित पवार त्यांना तिकीट देणारच आहे. मात्र भाजपनं तिकीट जाहीर होण्याआधीच विरोध केलाय आणि चित्र 2-3 दिवसांत स्पष्ट होईल. तोपर्यंत सगळेच वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.