लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान असलेल्या मतदार संघात बड्या बड्या नेत्यांच्या सभा होत आहे. ऊन तापत असताना आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही तापत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच पुण्यात सभा झाली होती. या सभेत त्यांनी शरद पवार भटकती आत्मा असल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला होता. मी स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे, असा हल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. महागाईबाबत भूमिका मांडताना 100 वेळा अस्वस्थता दाखवेन, असे ते म्हणाले होते. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्गमध्ये बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते. ते अस्वस्थ कधीच नसतात. ते बिनधास्त असतात. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बारा वर्ष केंद्रीय मंत्री राहिले. संरक्षण मंत्री दोन वर्षे राहिले. त्यानंतरही काहीच करु शकले नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक पद भोगली तरी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आता अस्वस्थपणा का जाणवतो, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
मी काही लोकांचा अभ्यास केला आहे. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत. ते नरेंद्र मोदी यांना म्हणतात, तुमचे सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही. परंतु आमचे सरकार जाणार नाही. आता आमचे 400 खासदार निवडून येणार आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत.
एकीकडे मोदी साहेब शरद पवार यांना मित्र म्हणतात. परंतु दुसरीकडे शरद पवार नेहमी त्यांच्यावर टीका करतात. मित्राला चांगले म्हणता येत नाही तर नका म्हणू. परंतु वाईट तरी नको बोलू, असा टोला नारायण राणे यांनी शरद पवार यांना लगावला.