पुणे : ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sakpal) यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यांवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची देखील शस्त्रक्रिया झाली होती. आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. सुरुवातीपासूनच त्यांचे जीवन संघर्षात गेले. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वाट्याला संर्घष आला. घरच्यांना मुलगी नको होती, मात्र तरी देखील मुलगी झाल्याने सिंधुताई यांचे नाव घरच्यांनी चिंधी ठेवले. नवरगाव ही त्यांची जन्मभूमी होती. हलाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना वडिलांच्या घरी पडेल ते काम करावे लागायचे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये सिंधुताई यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या 9 वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती श्रीहरी सपकाळ हे त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे होते. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी समाजकारणात उडी घेतली. त्यांनी त्याकाळात गुरे राखणाऱ्या स्त्रीयांचे प्रतिनिधित्व केले. या स्त्रीयांना काबाड कष्ट करावे लागायचे मात्र त्याबादल्यात त्यांना मजुरी मिळत नव्हती. याविरोधात सिंधुताई यांनी लढा उभारला व तो जिंकला देखील. येथूनच त्यांच्या समाजकारणाला सुरुवात झाली.
सासरचे घर सोडल्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ मुलांना आधार दिला. या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. या संस्थेप्रमाणेच सिंधूताई सपकाळ यांनी बाल निकेतन हडपसर, पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा, अभिमान बाल भवन, वर्धा, गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा, ममता बाल सदन, सासवड आणि सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था या अन्य संस्थेची देखील स्थापना केली.
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतुने देशभर भ्रमंती केली. देशात भ्रमंती करत असताना त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले. परदेशातून आपल्या कार्यासाठी अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली.