सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) एक विचित्र घटना घडली. सीएनजी पंपावर (CNG Pump) एक कार उभी होती. गाडीत सीएनजी भरला जात होता. मात्र वाहन चालकाने चुकीने त्याची कार पुढे घेतली. यावेळी गॅसचा पाइप कारच्या इंधन टाकीतच ठेवलेला होता. कार जशी पुढे गेली तसा गॅसचा पाइपही कारसोबत पुढे निघाला. त्यामुळे कार आणखी पुढे गेल्यामुळे सीएनजीचा पुरवठा करणारा पाइपच उखडला गेला. यामुळे अचानक मोठा स्फोट (Blast at CNG Pump) झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र वाहन चालकाच्या चुकीमुळे घटलेल्या या घटनेमुळे पंपावर उपस्थित असलेल्या नागरिकांना चांगलाच हादरा बसला.
सोलापूर ग्रामीण पोलीस पेट्रोल पंपावर रात्री ही दुर्घटना घडली. वाहन चालकाने गाडीत सीएनजी भरत असतानाच चुकीने गाडी अचानक पुढे न्यायला सुरुवात केली. त्यामुळे कारसोबत सीएनजी भरला जाणारा पाइपही पुढे गेला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचंही पाइपवरील नियंत्रण सुटलं आणि तो पाइप अचानक उखडला गेला. पंपावर मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की सुरुवातीला काय झालं हे कळालंच नाही. पंपावर उपस्थितांना हादरा बसला. काही वेळानंतर घटना काय घडली हे कळलं.
पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली. कारचालकाच्या चुकीमुळेच ही घटना घडल्याचं दिसून आलं. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. सोलापूर ग्रामीण पोलीस पेट्रोल पंपावर रात्री घडलेल्या या घटनेची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. पेट्रोल पंपावर स्फोट होण्यासाठी पेट्रोल पंप परिसरात मोबाइलवर बोलणे, सिगारेट ओढणे आदी कारणे घडलेली आहेत. मात्र अशा प्रकारे वाहन चालकाच्या चुकीमुळे स्फोट होण्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. सीएनजीच्या पंपावर गाडीत गरजेपेक्षा जास्त गॅस भरला गेल्यानेही स्फोट झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मुंबईतील पेट्रोलपंपावर दोन वर्षापूर्वी सीएनजी पंपावर अशा प्रकारची घटना घडली होती.