महाविकास आघाडीत बिघाडी, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा

| Updated on: Nov 30, 2024 | 1:48 PM

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही.

महाविकास आघाडीत बिघाडी, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा
maha vikas aghadi
Follow us on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. त्या धक्क्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरलेली नाही. एकीकडे या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जात आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेले मतभेद राज्यभर चर्चेत आले होते. काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उबाठाकडून सुरु आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

काय आहे ठाकरे गटाचा आरोप

सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी सांगितले की, सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिकेत आहे.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवावा असा अहवाल आम्ही पक्षप्रमुखांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही, असा आमचा आरोप आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत राहून शिवसेनेला फायदा होणार नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. या पराभवास स्थानिक नेते जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे सोलापूर महाविकास आघाडीत बिघाड झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.