राजकारणात काय घडतंय? कोण कुणाच्या बाजूने? अभिजीत पाटील रोहित पवारांच्या कार्यक्रमात

| Updated on: Oct 04, 2024 | 5:43 PM

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिजीत पाटील मंचावर दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राजकारणात काय घडतंय? कोण कुणाच्या बाजूने? अभिजीत पाटील रोहित पवारांच्या कार्यक्रमात
अभिजीत पाटील आणि रोहित पवार यांचा फोटो
Follow us on

राजकारणात काहीही घडू शकतं, असं म्हणतात. राजकारणात कुणीही फार काळपर्यंत मित्र असू शकत नाही आणि कुणीही फार काळपर्यंत शत्रू असू शकत नाही. जशी परिस्थिती बदलते तशी राजकीय समीकरणंदेखील बदलतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी राजकारणाचा विषय जास्त जिव्हाळ्याचा मानू नये. कारण राजकीय गणितं कधीही बदलतात आणि सत्ताधारी विरोधात जावून बसतात तर विरोधातले सत्तेत येतात. त्यामुळे राजकारणात म्हटलं तर खूप ताकद असले आणि म्हटलं तर ताकदही नसते. काहीवेळेला प्रवाहानुसार जावं लागतं. अनेक नेते तशे प्रवाहानुसार चालतात आणि संधी मिळताच आपला राजकीय डाव आखतात. अर्थात प्रत्येकजण प्रत्येकाच्या विचारानुसार राजकीय रणनीती आखत असतं आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करत असतं. हे सर्व सांगण्यामागील कारणं म्हणजे माढ्यात आज जी घटना घडली त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील माढ्याच्या अरण मधील संत सावतामाळी भक्तनिवास लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाले. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिजीत पाटील मंचावर दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अभिजीत पाटील हे शरद पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जायचे. पण लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या कारखान्यावर ओढावलेल्या परिस्थितीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते तेवढ्यावरच थांबले नव्हते तर त्यांनी त्यावेळचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविरोधात प्रचार केला होता. पण आता आज अचानक ते रोहित पवार यांच्या कार्यक्रमात मंचावर दिसल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे अभिजीत पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे निश्चित आहे. अशातच थेट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला अभिजीत पाटील उपस्थित राहीले आहेत. अभिजीत पाटील कट्टर शरद पवार समर्थक असताना कारखान्यावर शिखर बॅंकेची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी भाजपला माढा लोकसभेला पांठिबा दिला होता. आता अभिजीत पाटील पुन्हा रोहित पवारांच्या मंचावर दाखल झाल्याने अनेक राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

माढ्याच्या आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली?

दरम्यान, एकीकडे या सर्व घडामोडी सुरु असताना माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोठी घोषणा केली. बबनराव शिंदे या निवडणुकीत आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना आपल्याजागी उमेदवारी देणार आहेत. पण महायुतीत उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाल्यानंतर बबनराव शिंदे यांनी वेगळा मार्ग अवलंबला आहे. बबनराव शिंदे यांनी शरद पवारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तसेच त्यांनी आज मोठी घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत मुलगा रणजितसिंह शिंदे यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर तुतारी चिन्हावर किंवा अपक्ष उमेदवारी लढवू, अशी घोषणा बबनराव शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाची लढाई चांगलीच तापण्याची चिन्हं आहेत.