सोलापूर | 17 जानेवारी 2024 : काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपच्या एका मोठ्या नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे यांना भाजपात प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चांवर स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर आले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
“भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे. पण ती गोष्ट वेगळी आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“कुणीही मोदीजींच्या नेतृत्वात भाजपचा दुपट्टा घालण्यास तयार असेल, जसे अजित दादा (उपमुख्यमंत्री अजित पवार) यांनी भाजपला समर्थन देताना सांगितले होते, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजप बरोबर आले”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“भाजपचा दुपट्टा नेहमी तयार आहे. तो कुणीही असूद्या. मात्र त्यासाठी आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही आणि कुठल्याही सीट संदर्भात कमिटमेंट देणार नाही. भाजपचे खासदार की आमदार असे म्हणणार नाही. मोदीजींना साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि बावनकुळे यांचा एका गाडीत दाटीवाटीत बसतानाचा व्हिडीओ ट्विट केलाय. त्यांच्या या व्हिडीओवरदेखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आता इतके पक्के आहोत, आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तर आम्ही गाडीत बसवू. पण महाराष्ट्रात चांगलं सरकार आणू, या करता आम्ही सर्व एकत्र आहोत”, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “काही लोक स्टंटबाज आहेत, सकाळी 9 वाजता झोपून उठायचं, मीडियाशी काही तरी बोलवं लागणार म्हणून बोलतात. संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर आमदार नितेश राणे देतील”, असं बावनकुळे म्हणाले.
“सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सर्वसामान्य जनतेला 15 हजार घरे देण्यासाठी मोदीजी सोलापुरात येत आहेत. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, सोलापुरातील वॉरियर्स बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी करण्यात आली होती”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.