आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत कसा असणार आहे त्यांचा दौरा, तसेच आषाढी यात्रा काळात मंदिरे समितीच्या भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, विठोबाचे २४ तास दर्शन या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आता सज्ज झालं आहे. असं असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज आषाढी एकादशी यात्रेच्या नियोजनाच्या कामांची पाहणी करत आहेत.
विशेष म्हणजे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलेटवरून आषाढी यात्रा नियोजनाच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. भाजपचे आमदार समाधान आवताडे या बुलेटचे स्वारथ्य करणार आहेत. एकनाथ शिंदे 65 एकर भक्तिसागर परिसरातून बुलेटवर बसून गोपाळपूर पत्रा शेड, दर्शन बारीची पहाणी करणार आहेत. आरटीओचे नियम पाळत हेल्मेट वापरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलेट वारी करणार आहेत. भाजप आमदार समाधान आवताडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक हे पंढरपूरला जात असतात. याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातून 70 बसेसचं नियोजन राज्य परिवहन विभागातर्फे करण्यात आलं आहे. नंदुरबार बस आगारातून पहिली बस पंढरपूरसाठी रवाना झाली आहे.
दरम्यान, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचा धावा आज तोंडले-बोंडले या गावाजवळ पार पडला. “तुका म्हणे धावा धावा; आहे पंढरी विसावा” या तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती याच टप्प्यावर येते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी याच टप्प्यावर धावा धावा करत उतारावर धावतात.
आषाढी यात्रामध्ये लाखोंची गर्दी झाल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी सभा मंडप आता आरक्षित असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना सुरक्षित ठिकाण म्हणून मंदिरातील महत्त्वाचा भाग असणारा बाजीराव पडसाळी, आरक्षित ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे बाजीराव पडसाळीला देखील पुरातन रूप देण्यात आले आहे.