सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावात चौंडेश्वरी देवीची यात्रा पार पडली. या यात्रेत विविध परंपरा आजही जोपासल्या जात असल्याचे पहायला मिळाले. यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते जीभेतून तार ओवणे आणि कोळश्याच्या निखाऱ्यावरुन चालणे. या दोन्ही प्रथा आजही करजगी गावच्या चौंडेश्वरी देवीच्या यात्रेत कायम आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत अग्निपरीक्षा, सूल हे कार्यक्रम पाहण्यासाठी कर्नाटकातून करजगी गावात येतात.अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे चौडेश्वरी यात्रा महोत्सव निमित्त आठ दिवस धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी नरसिंह देवाची भव्य मिरवणूक, रविवारी आंबली कुंभ व रात्री बालबट्टल, सोमवारी देवीची ओटी भरणे व कुंभ व रात्री देवीची मिरवणूक, रात्री सुवासीनीची ओटी भरणे व देवीची मिरवणूक, मंगळवारी सुवासीनीची ओटी भरणे व रात्री देवीची मिरवणूक काढण्यात आली.
कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे मागील दोन वर्ष चौंडेश्वरी देवीची यात्रा साजरा करण्यात आली नव्हती. परंतु यावर्षी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले चौंडेश्वरी देवीची यात्रा येथे मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यांच्या सेवेसाठी चौडेश्वरी यात्रा महोत्सव समितीच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आले आहे.
चौंडेश्वरी देवीची यात्रा होणार म्हणून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. या यात्रेसाठी दूरदूरून भाविक आले होते. त्यामुळे यात्रेत मोठी गर्दी झाली होती. यावेळी सोंग काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत धार्मिक कार्यक्रमही पार पडले. या यात्रेत महिलांनी सर्वाधिक भाग घेतला होता. आकाश पाळणे, फेरिवाले, खेळ, खाद्यपदार्थांची रेलचेल या यात्रेत पाहायला मिळाली. यावेळी गुलाल आणि हळद उधळत देवीच्या नावाने जयघोष करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. भक्तांनी देवीचं दर्शन घेत गाऱ्हाणं मांडलं. तर काहींनी नवसही फेडले.