सोलापूर – सोलापुरातील (Solapur) नव्याने स्थापन झालेल्या महात्मा बसवेश्वरांच्या (Mahatma Basaweshwar) स्मारक समितीवरुन आता नवा वाद समोर आला आहे. राज्य सरकारने 11 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला आता विरोध करण्यात आलाय. या समितीत पालकमंत्र्यांना डावलण्यात आले आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जात होती. पालकमंत्री हे जिल्ह्याचे प्रमुख असून त्यांना वगळून जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अवमुल्यन झालेले आहे. या नव्या समितीमुळे राज्यातील समस्त लिंगायत समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन सदरच्या स्मारक उभारणीस गठीत केलेल्या समितीस विरोध होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने समिती गठित करावी अशी मागणी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्राम विकासमंत्री तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे केली.
नाना पटोलेंनी घेतली तात्काळ दखल
या मागणीची तात्काळ दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सध्याच्या समितीला स्थगिती दिली आहे. तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या समितीत पालकमंत्र्यांना आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक आणि लिंगायत धर्मगुरु महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश देऊन लोकशाही मुल्यांची बीजे रोवली. म्हणूनच आज संपूर्ण जग स्वातंत्र्य, समता, बंधूता याचे पुरस्कर्ते म्हणून महात्मा बसवेश्वरांना गौरविले जाते. अशा थोर व्यक्तीच्या स्मारक समितीमध्ये राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री यांच्याच अध्यक्षतेखाली समिती गठीत व्हावे अशी समस्त लिंगायत समाजाची मागणी होत आहे. सदर गठीत केलेली समितीची पुर्नरचना करुन जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री हेच स्मारक समितीचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. जर तसे न झाल्यास राज्यभरात लिंगायत समाजाचा उद्रेक झाल्यास शासन जबाबदार राहील.
सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करुन उग्र आंदोलन करण्याचा इशारा
आमची मागणी मान्य न केल्यास येणाऱ्या काळात राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करुन उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीद्वारे निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान या समितीच्या निवेदनाची दखल घेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करुन नव्याने या समितीची रचना करून त्यात पालकमंत्र्यांना स्थान देण्यात यावे अशी विनंती नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे असं विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितलं.