मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी एकीकडे उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या समन्वयकांमध्ये फूट पडताना दिसत आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूलाच राहिला आणि दोघांमध्ये आता वेगळच राजकीय युद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे. हे राजकीय युद्ध आता कुठपर्यंत जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्क्यांचं आरक्षण दिलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टातही मराठा आरक्षणासाठीच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार पडत आहे. मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत. जरांगे त्यासाठी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. असं असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या दोन वेगवेगळ्या संघटनांच्या समन्वयकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याने राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. अतिशय आक्रमक पद्धतीने दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया दिल्या जाताना दिसत आहे.
विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले असले तरी आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडताना दिसत आहे. सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना दिसत आहे. “इशारा देणारे मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देत नाहीत की त्यांचा पाय शरीरावर राहतो ते पाहू”, असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांना मोठा इशारा दिला आहे.
“मराठा समाजाचा स्वघोषित समन्वयक माऊली पवारने कार्यक्रम उधळून लावण्याच्या इशाऱ्याला आमचा विरोध आहे. मुळात माऊली पवारने लोकसभेला घेतलेले महाविकास आघाडीचे टेंडर विधानसभेत राबवत आहेत. लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून माऊली पवारने टेंडर घेतले. मग त्यांनी खासदार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली का? त्यांच्या मागण्या लोकसभेत मांडल्या का?”, असा सवाल अमोल शिंदे यांनी केला.
“माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे की, कार्यक्रमाच्या दिवशी इशारा देणाऱ्यांना ताब्यात घेऊ नका. कार्यक्रमाच्या गर्दीत त्यांना मोकळे सोडा. मग बघू कोण कोणाला पाय ठेवू देत नाही किंवा यांचा पाय राहतो का, स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवारने महाविकास आघाडीचा अजेंडा राबवू नये. माझे माऊली पवारला आव्हान आहे की, त्याने खासदार प्रणिती शिंदेकडून किंवा तिच्या पप्पाकडून लिहून आणावे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे. त्यांनी जर लिहून दिले तर मग मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लिहून आणतो”, असा घणाघात अमोल शिंदे यांनी केला.