सोलापूरः सोलापूरमधील अवघ्या सतरा वर्षीय आदित्य कोडमूरचे (Aditya Kodmoor) नाव आता गिनीज बूकमध्ये नोंदवले (Guinness Book of World Records) गेले आहे. तेही अगदी सर्वात तरुण जादूगार म्हणून त्याची आता ओळख निर्माण झाली आहे. पत्त्याच्या डावातील कार्ड फेकण्यात म्हणजेच कार्ड थ्रो (Card throw) या प्रकारात आदित्यने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. निर्धारित लक्ष्यावर अचूकपणे खेळण्यातील पत्ते फेकण्यात त्यानं अमेरिकेच्या थ्रोअरचे रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे आता ‘कार्ड थ्रो’चं वर्ल्ड रेकॉर्ड आदित्यच्या नावावर जमा झाले आहे.
अमेरिकेन थ्रोअर ट्रॅव्हिश स्टीचने याच वर्षी 25 कार्ड अचूकपणे थ्रो करून गिनिज बुकात आपल्या नावाची नोंद केली होती. मात्र आदित्यनं स्टीचपेक्षा 92 कार्ड जास्तीचे म्हणजे 117 कार्ड थ्रो करून स्वतःचं नाव या रेकॉर्डवर कोरलं आहे.
गेल्या सात वर्षांपासून आदित्य वेगवेगळे जादूचे प्रयोग करून दाखवतो, मात्र आपण काहीतरी वेगळे करावे यासाठी त्याने तब्बल दोन वर्षे सराव केला. त्यानंतर 21 डिसेंबर 2021 रोजी त्याने कार्ड थ्रो केले. त्यानंतर पाच महिन्यांनी त्याला गिनीज बूकमध्ये आपले नाव नोंदले गेल्याचे ईमेलद्वारे सांगण्यात आले. दरम्यान त्याच्या रेकॉर्डमुळे आता जगभरात सोलापूरचा डंका वाजतो आहे.
आदित्य ज्या प्रकारे कार्ड थ्रो करतो त्यामध्ये विशिष्ट अंतरावर गोल पाइप ठेवण्यात येतो. त्या पाइपमध्ये लांबूनच पत्ता टाकायचा असतो. आणि ते ही एकामागोमाग असे पत्ते त्या पाइपमध्ये टाकायचे असतात. या प्रकारात आदित्यने एक नाही दोन नाही तर तब्बल 117 पत्ते त्याने अचूकरित्या टाकून विक्रम नोंदविला गेला आहे.
आदित्यने आपल्या प्रयत्नामुळे आपले आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचवले आहे. यासाठी त्याने मेहनत घेतली असून हैदराबादचे जादूगार आणि कार्ड थ्रोअर राहुल कृष्णन यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी आदित्यला मार्गदर्शन केले आहे.