सोलापूर : मशिदींवरील भोंगे (Loud speakers) आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात (Politics in Maharashtra) तापलंय. पण या तापलेल्या वातावरणात महाराष्ट्रानं आवर्जून पाहावं असं एक महाराष्ट्रातलंच आदर्श गाव आहे. या गावात हिंदू मुस्लिम एकतेचं (Hindu Muslim Unity) प्रतिक पाहायला मिळालय. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मोडनिंब नावाचं गाव आहे. भोंग्यांच्या वादात सोलापूरच्या माढ्यातील मोडनिंब गाव आदर्शच म्हणावं लागेल. या गावातील मशिदीतून हनुमान मंदिरासाठी पाणी दिलं जातं. तर मंदिरातील कार्यक्रम मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणासाठी काही वेळ थांबवला जातो. मुस्लिम बांधवांची प्रार्थना संपली की कार्यक्रम पुन्हा सुरु होतो. मिळून मिसळून गावातील सर्वधर्मीय लोकं गुण्यागोविंदानं नांदत आहेत. भोंग्याच्या वादात या गावाकडे कटाक्ष टाकायला हवा, तो यासाठीच. वेगवेगळ्या जाती धर्माचे, पंथाचे, विचारसरणीचे, वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या या देशाची खरी ओळख जर कोणती असेल, तर ती ‘एकात्मता’ हीच आहे. जी जपली पाहिजे. वाढवली पाहिजे. जोपासलीही पाहिजे.
मोडनिंब गावात हनुमान मंदिर आणि मस्जिद शेजारीच आहे. हनुमान मंदिर धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी मस्जिदीमधून पाणी दिले जातं. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरु आहे. मुस्लिम बांधवांनी मस्जिदीच्या बाहेर पाण्याचा कॉकदेखील काढला आहे.
हनुमान जयंतीदिनी मंदिरात कार्यक्रम सुरु असताना नमाज पठण सुरु होताच, एका अत्यंत नम्र गोष्ट या गावात पाहायला मिळाली. नमाज पठण सुरु होताच हनुमान जयंतीचा कार्यक्रम थांबवला गेला. तसेच मुस्लिम बांधवदेखील हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरु होताच पठण बंद करत. एकीकडे मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या समोर आलेल्या मनसेच्या भुमिकेमुळे वातावरण तापलं. त्यानंतर भोंग्यांना हनुमान चालिसेने प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न काही ठिकाणी दिसले. या वादात मात्र मोडनिंबकरांचा आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांनी घेण्याची गरज व्यक्त केली गेली, तर ते योग्यच म्हणावं लागेल.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हे हिंदू मुस्लिम एकतेचे काम करतोय.आम्हांला भोगा आणि हनुमान चालिसा हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही.हा केवळ राजकिय स्टंट सुरु असल्याचे मोडनिंब मधील मुस्लिम बांधवांनी सांगितलंय.
हनुमान मंदिराचे पुजारी संतोष गुरव यांनी म्हटलंय, की…
मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पाईप द्वारे मंदिर स्वच्छतेसाठी देताहेत.कीर्तन भजन सुरु झाले की नमाज पठण बंद केली जाते.आम्ही गावात बंधु भावाने राहतोय.
नूरभाई तांबोळी या मोडनिंबमधील एका स्थानिकानं म्हटलंय, की…
मंदिर आणि मस्जिदीमध्ये फक्त 15 फुटाचे अंतर आहे. हिंदू-मुस्लिम समाजाचे आमचे ऋणानुबंध कायम आहेत. यामुळे गावात शांतता आणि हिंदू मुस्लिम एकात्मता कायम राहिली आहे. हे पाहून अनेक जण आश्चर्यचकीत होतात.
राज्यात सध्याची परिस्थिती पाहता हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या मोडनिंब शहराचा सार्थ अभिमान वाटतोय, असं प्रथमेश शिंदे या मोडनिंब मधील प्रथमेश शिंदे यानं म्हटलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या तीन मे पर्यंतच्या अल्टिमेटमनंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीही बाळगली जाते आहे. राज्यातील मशिदींवरील भोंग्यांचा इतरांना त्रास होत असल्याचं म्हणत हे भोंगे उतरवायला लावा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत म्हटलं होतं. हे भोंगे तीन मे पर्यंत उतरवले गेले नाहीत, तर मनसे याला हनुमान चालीसेनं उत्तर देईल, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
Akola: जेव्हा मोठ्या बहिणीला छोटेपणीच आई व्हावं लागतं! का? आईला परीक्षा देता यावी म्हणून…