उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण तशा घडामोडी सध्या सुरु आहेत. विशेष म्हणजे महायुतीमधून सातत्याने काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने आपल्याला उलट्या होतात, असं वक्तव्य केल्याने महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. पण महायुतीच्या वरिष्ठांनी हे प्रकरण निवळलं होतं. तरीदेखील महायुतीमधील पक्षांना सातत्याने राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. कागलमध्ये भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तुतारी हातात घेत आहेत. त्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी तसा इशारा पक्षाला दिला आहे.
फलटणमध्ये महायुतीत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहेत. फलटण येथे आज आयोजित केलेल्या एका बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.
“गल्लोगल्ली दहशत करणाऱ्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विषयी आमची तक्रार आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीला साथ देऊ नका. अन्यथा आम्ही तुतारी हातात घेऊ”, असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीतील वरिष्ठांना दिला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती. पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांचा विरोध होता. विशेष म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची इच्छा आधीच बोलून दाखवली होती. पण रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी बंड पुकारलं. यानंतर बऱ्याच बैठका घडून आल्या आणि अंतिमत: त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि ते जिंकूनही आले. या काळात रामराजे निंबाळकर यांनी रणजीतसिंह यांच्याविरोधात भूमिका मांडत शरद पवार गटात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी तसा इशारा दिला आहे.