‘प्रत्येक गोष्टीला तयार राहा’, नीलम गोऱ्हे असं का म्हणाल्या? ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

| Updated on: Oct 06, 2024 | 6:37 PM

"मी म्हणाले की, दर तीन-चार दिवसांनी महाराष्ट्राचा राजकारण बदलतंय. निवडणुका जाहीर होऊन फॉर्म भरेपर्यंत असे बदल नेहमीच होत असतात. अत्यंत परिपक्व पद्धतीने या बदलांकडे पाहणं ही कार्यकर्त्यांची मानसिकता असली पाहिजे", असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हे यांनी दिलं.

प्रत्येक गोष्टीला तयार राहा, नीलम गोऱ्हे असं का म्हणाल्या? त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण
नीलम गोऱ्हे
Follow us on

शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट राहा, नाहीतर धावपळ होईल”, असं सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. “मी जे बोलले त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे. 2014 पासून युती होणे, निवडणुका आणि अनेक लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, या वस्तुस्थितीकडे पाहिले तर एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते. अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण, विज बिल माफी, पेसा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेत आहेत. मराठा, धनगर आरक्षणाबाबत योग्य निर्णय होईल. कोणावर अन्याय होणार नाही याची खात्री आहे”, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

“मी म्हणाले की, दर तीन-चार दिवसांनी महाराष्ट्राचा राजकारण बदलतंय. निवडणुका जाहीर होऊन फॉर्म भरेपर्यंत असे बदल नेहमीच होत असतात. अत्यंत परिपक्व पद्धतीने या बदलांकडे पाहणं ही कार्यकर्त्यांची मानसिकता असली पाहिजे. अनेकदा कार्यकर्त्यांचा तात्कालीक दबाव, भावना याचा अतिरेक होतो. जे नवीन कार्यकर्ते, ज्यांनी निवडणुका पाहिल्या नाहीत त्यांच्यासाठी ते विधान केले. पुढील तीन दिवसांनी आपण परत बोलूया”, असं सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं.

‘एकनाथ शिंदे यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणे झाले, त्यानंतर…’

“आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणे झाले. त्यानंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे देखील बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला तिघेही एकत्र होते. त्यामुळे असं काय होईल का म्हणत राहणं म्हणजे त्या व्यक्तिबद्दल संदेह निर्माण करणं होईल असं मला वाटतं. पण वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होत असताना ते त्यांची भावना मोकळेपणाने बोलून दाखवत आहेत. तो त्यांचा पूर्णपणे प्रश्न आहे. मात्र आम्ही आमचा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकसंघपणे नेणं आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ कार्यकर्त्याला देणे यावर लक्ष आहे. महाभारतात अर्जुनाचे लक्ष ज्याप्रमाणे माशाच्या डोळ्यावर होते, त्याप्रमाणे आमचं लक्ष विधानसभेच्या निवडणुकांवर आहे”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

‘त्यामुळे मी त्यांना सांगितलं की प्रत्येक गोष्टीला तयार राहा’

“अनेक राजकीय अभ्यासक असले तरी सर्व पक्ष स्वतंत्र निवडणुका लढतील असं कोणी भाकीत करणार नाही. पण एव्हरीथिंग इस पॉसिबल इन पॉलिटिक्स, पण आत्ताच्या घडीला महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या परीने लढेल. काय बदल होतात, काय नाही हे तिथल्या परिस्थितीवर अवलंबून असते. कार्यकर्ता किंवा सैनिक यांची भूमिका ही आपला नेता हा महासेनापती आहेत. ते म्हणतील त्या पद्धतीने फॉलो करणं अशीच असते. मात्र उत्साही आणि अभ्यासू पत्रकारांमुळे कार्यकर्ते काम करण्याऐवजी हीच चर्चा करत बसतात. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की प्रत्येक गोष्टीला तयार राहा”, असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हे यांनी केलं.