सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation Election) नव्या प्रभागरचनेची चर्चा होती. राज्यात येत्या काही दिवसातच मोठ्या नगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय आखाडे पुन्हा तापले आहेत. निवडणुका होणाऱ्या महापालिकेत सोलापूर महापालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे सोलापुरातही निवडणुकीची चाहूल लागली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन प्रशासनही जोमाने कामाला लागलंय. प्रशासनाने नव्या प्रभागरचनेचा (New ward structure) तयार केलेला आराखडा आज सर्वासमोर आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूरची प्रभाग रचना कशी असेल याबाबत उत्सुकता होती. आज प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुक उमेदवार (Election Candidate) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पालिकेत पाहायला मिळाली.
कुणाला दणका? कुणाला दिलास?
नव्या प्रभागरचनेत कुणाला दिलासा मिळणार आणि कुणाला दणका बसणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती, तेही चित्र आता स्पष्ट झालं आहे. अनेकांचे वार्ड जैसे थे राहिल्याने आनंद व्यक केला तर काही जणांचे वार्ड फुटल्याने काही जण नाराज असल्याचं ही पाहायला मिळालं. नव्या रचनेनुसार तीन सदस्य पद्धतीने होणाऱ्या सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीतून 38 प्रभागातून 113 नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. यातील 37 प्रभाग तीन नगरसेवकांचे तर 38 वा प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल. साधारणपणे 22 हजार 700 ते 27 हजार 600 लोकसंख्येचा एक प्रभाग करण्यात येणार आहे.
आज झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 14 फेब्रुवारी पर्यंत सूचना हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. आलेल्या हरकतीवर विचार विनिमय करून प्रभागरचना अशीच राहणार की त्यात बदल होणार याबाबत निर्णय होणार आहे. सोलापुरात जवळपास पाच भाषा बोलणारे मतदार मतदान करतात. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे राजकारण नेहमी चर्चेत राहिले आहे. सोलापुरात कन्नड, तेलगू, हिंदी भाषिकांची संख्याही मोठी आहे. हे मतदारही महापालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नव्या प्रभागरचनेत याचा कुणाला फायदा होणार? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.