पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली वाढल्या आहेत. दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे उद्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेशाचा पंढरपुरात भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव स्वत: आज सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासह तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ आलं आहे. त्याचबरोबर तब्बल 400 ते 500 गाड्यांचा ताफा तेलंगणाहून आला आहे. के चंद्रशेखर राव आणि त्यांचं मंत्रिमंडळ उद्या सकाळी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात जावून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर भगीरथ भालके यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे . पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता भालकेंसोबत जाणार नसल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे बीआरएस पक्ष प्रवेशापूर्वीच भालके एकाकी पडले असा दावा करण्यात येतोय.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हेलिकॉप्टरने करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीला परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने वाखरी येथील रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी नाकारली. तर के चंद्रशेखर राव यांच्यासह 200 सहकाऱ्यांच्या व्हिआयपी दर्शनासाठी मागितलेली परवानगीपैकी केवळ मुख्यमंत्री राव यांनाच VIP दर्शनाला परवानगी देण्यात आली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केवळ मुख्यमंत्री राव यांनाच परवानगी दिली. 5 लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक वाखरी रिंगण सोहळ्यात उपस्थित राहतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने परवानगी नाकारण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने वाखरी रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी परवानगी नाकारली. माजी खासदार धर्मांन्ना साधूल यांनी हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. पण ही मागणी नाकारण्यात आली आहे. जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी याबाबत परवानगी नाकारल्याचे पत्र काढले आहे.
दरम्यान, “सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी ही परवानगी नाकारली आहे. वारकऱ्यांच्या गोष्टीतही सरकारला राजकारण दिसतंय ही दुर्दैवी बाब आहे”, अशी प्रतिक्रिया बीआरएस किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली.