संदीप शिंदे, Tv9 मराठी, सोलापूर : पुण्यात दोन दिवसांपूर्वी एका तरुणीवर कोयता हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यावेळी एमपीएससी परीक्षांची तयारी करणारा तरुण लेशपाल जवळगे याने या तरुणीला वाचवले. या तरुणाला हर्षद पाटील या तरुणाने मदत केली. या दोन्ही तरुणांचं राज्यभरात कौतुक होतंय. काही जणांकडून त्यांना बक्षीसही जाहीर झालंय. लेशपालच्या या कर्तृत्वानंतर आम्ही त्याच्या आई-वडिलांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी लेशपालच्या आई-वडिलांनी त्याच्या कर्तृत्वाबद्दल सार्थ अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. पण यावेळी त्यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी केली.
लेशपाल हा माढा तालुक्यातील आढेगावचा रहिवाशी असून तो अतिशय गरिब शेतकरी कुटुंबातील आहे. लेशपालची आई लक्ष्मी आणि वडील चांगदेव जवळगे यांनी आमच्या मुलाने शौर्यपणा दाखवून केलेल्या कार्याचा आणि असा पुत्र आम्ही घडवला याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
लेशपालने केलेल्या कामांचा आई-वडील म्हणून सार्थ अभिमान वाटला. पण जे पद मिळण्यासाठी लेशपाल अहोरात्र झटतोय त्या पीएसआय पदावर सरकारने त्याची नेमणूक करावी, अशी मागणी लेशपालच्या आई-वडिलांनी सरकारकडे केली आहे.
“लेशपालने खाकी वर्दीतला अधिकारी (PSI) होण्याची जिद्द बाळगून तो या पदांसाठी अहोरात्र झटतोय. मागील 3 वर्षांपासून त्याला 1 ते 2 गुणाने अपयश येतंय. लेशपालचे कार्यकर्तृत्व पाहून सरकारने त्याची पीएसआय पदावर नेमणूक करावी”, अशा भावना देखील आई-वडिलांनी बोलताना मांडल्या.
दुसरीकडे लेशपालने आपल्या आई-वडिलांच्या मागणीचं समर्थन केलं आहे. “माझ्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेत गैर काहीच नाही. मी प्रयत्नांची पराकाष्टा किती करतोय, त्यात मला थोडक्यात अपयश येतंय”, असं लेशपालने सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लेशपालने केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी लेशपाल आणि हर्षद पाटील या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोघांच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारला आहे.