ओबीसी समाजाकडून सांगोला बंदची हाक, सोलापुरात काय घडतंय?

| Updated on: Jun 20, 2024 | 8:53 PM

ओबीसी समाजाच्या वतीने उद्या सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगोलो येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत उध्या सांगोला शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ओबीसी समाजाकडून सांगोला बंदची हाक, सोलापुरात काय घडतंय?
ओबीसी आरक्षण
Follow us on

मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा नेते मनोज जरांगे यांनी ठरवलेली सगेसोयरेच्या व्याख्यानुसार आरक्षण दिलं जाऊ नये. तसं आरक्षण दिल्यास त्यांनाही ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण दिलं जाईल. त्यामुळे सध्याच्या लाखो ओबीसी नागरिकांच्या आरक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. सरकारने तसं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी ओबीसी समाजाच्या आंदोलकांची आहे. याच मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या आठ दिवसांपासून जालन्याच्या वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारकडून उपोषण सोडवण्यासाठी कोणतेही सकारात्मक प्रयत्न करण्यात आले नसल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांचा आहे. दरम्यान, ओबीसी आंदोलकांनी उद्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरात बंदची हाक दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलकांकडून सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

ओबीसी समाजाच्या वतीने उद्या सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगोलो येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत उध्या सांगोला शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी उद्या सांगोला तालुक्यातील नाझरा येथील टोल नाक्यावर 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच सांगोला शहर बंद ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी समाजाकडून सर्व व्यापाऱ्यांना उद्या दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारचं शिष्टमंडळ उद्या हाकेंची भेट घेणार

राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी जाणार आहे. तिथे सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांसोबत चर्चा करुन उपोषण सोडवण्यासाठी आग्रह करणार आहे. यावेळी सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी गेले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण उद्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ पाठवू, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आता उद्या काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं आहे.