मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली, सोलापुरात उद्या शाळांना सुट्टी जाहीर

| Updated on: Aug 06, 2024 | 9:54 PM

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्या सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत 'शांतता रॅली' काढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली, सोलापुरात उद्या शाळांना सुट्टी जाहीर
मनोज जरांगे पाटील
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे उद्या सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्या सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ‘शांतता रॅली’ काढणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्यापासून जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शांतता रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हादंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे. शाळेला जरी सुट्टी असली तरी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ड्युटी करणे अनिवार्य असल्याचं आदेशात म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीहून तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे आज तुळजापूर मुक्काम केल्यानंतर उद्या सोलापूरला जाणार आहेत. सोलापूर येथे जरांगे पाटील यांच्या उपस्थित महाशांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. जरांगे यांचा उद्या सोलापूरपासून दौरा सुरू होत आहे. मनोज जरांगे यांनी ज्यांना तारीख दिली आहे, त्या जिल्ह्यातील मराठा समाज रॅलीला ताकदीने येणार आहे.

जरांगे यांचं मराठा समाजाला रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन

“आपल्या मुलांना, शेतकऱ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ही शेवटची संधी आहे. ज्या ठिकाणी रॅली होणार आहे त्या ठिकाणी काम बंद करून मराठा समाज येणार आहे. आपल्या मुलांसाठी समाज एकत्र येणार आहे. शेवटी आम्हला न्याय पाहिजे. हा संदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. राजकारणी लोक, मोठे करणे हा आमचा पिंड नाही. आमचे लेकरे मोठे करणे हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

“”त्यांना आरक्षण द्यायचे नाही म्हणून आमदार, मंत्री, विरोधक, ओबीसींचे छगन भुजबळ हे सर्व विरोधात उतरले आहेत. पण आपण आपल्या माणसाला उघडे पडू द्यायचे नाही. प्रत्येक जिल्ह्यात मिळेल त्या वाहनाने मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. पुढची लढाई ही शेतकरी, मराठा, मुसलमान, धनगर बांधवांची असणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.