सोलापूर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका राज्यसभेच्या खासदारासाठीचा प्रतिष्ठेचा तमाशा जनता पाहत असताना, दुसरीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र कायम आहेत. सोलापुरात हक्काचे पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी लाचेची (bribe demand for pension)मागणी केल्याने व्यथित झालेल्या निवृत्त पोलीस हवालदाराने (retired police constable)आत्महत्या (Suicide)केल्याची ह्रद्यद्रावक घटना घडली आहे. कल्याण गावसाणे असं या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कॅन्सरमुळे हवालदार गावसाणे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर हक्काचे पेन्शन मिळावे यासाठी त्यांच्या नशिबी फेऱ्या आल्या. त्यांनी ज्या कारागृहात काम केले, त्याच ठिकाणी त्यांचे वरिष्ठच त्यांच्याकडे लाच मागत होते, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. राज्यातील प्रशासकीय व्यवस्था किती भ्रष्टाचारी आहे, हेच यातून स्पष्ट होतंय का, असा प्रश्न आता विचारला जातो आहे.
हवालदार कल्याण दगडू गावसाणे हे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात नोकरीला होते. कॅन्सर झाल्यामुळे, हवालदार गावसाणे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. स्वेच्छा निवृत्तीनंतर हक्काचे पेन्शन मिळावे यासाठी ते नाशिकमधील कारागृहाच्या कार्यालयात फेऱ्या मारत होते. कॅन्रसवरील उपचारासाठी त्यांना या पैशांची नितांत आवश्यकता होती. मात्र नेमकी याच ठिकाणी ते ज्या ठिकाणी काम करत होते, तेथील अधिकारी अडवणूक करीत होते.
स्वेच्छानिवृत्तीचे पैसे हवी असतील तर लाच देण्याची मागणी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी करीत होते. लाच देऊनही पैसे मिळत नसल्याने गावसाणे वैतागलेले होते. वारंवार चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने हवालदार गावसाणे यांनी वरिष्ठांना आत्महत्येच्या धमक्याही दिल्या होत्या. त्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी गावसाणे यांना उलट उत्तरे दिली आणि आत्महत्येची धमकी काय देतोय, जा जाऊन आत्महत्या कर, अशी डिवचण्याची भाषा या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वापरल्याचा गावसाणे कुटुंबीयांचा आरोप आहे. तसेच त्यांना असे सांगून हाकलून दिल्याची माहितीही त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे, यातून व्यथित झालेले गावसाणे घरी परतले आणि त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
गावसाणे यांनी पेन्शन मिळावे यासाठी लाचही दिली होती. मात्र पैसे पाठवूनही पेन्शन न दिल्याने अखेरीस त्यांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर नाशिक जेलमधील अधिकाऱ्यांनी आमच्याविरोधात तक्रार देतोस का, आता तुझे काम होऊ देत नाही अशी दमदाटी गावसाणे यांना केली होती. आधीच कॅन्सरमुळे अडचणीत असलेले गावसाणे, या सगळ्या प्रकारामुळे वैफल्यग्रस्त झाले होते, त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा कुटुंबीयांनी सांगितले आहे.
गावसाणे यांच्या निमित्ताने पोलीस दलातील कर्मचारी आणि इतर निवृत्त कर्मचाऱ्यांची काय अवस्था आहे, हे समोर आले आहे. आता त्यांच्या आत्महत्येनंतर तरी त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. सरकारने प्रतिष्ठेच्या लढतीत कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा, उपेक्षितांना न्याय मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.