सोलापूर : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवण्यासारखं असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यानंतर आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी राज्यात सरसावले. ठाकरे गटातर्फे सोलापुरात गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान आहे की, तुमचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल तर उद्याच्या उद्या राज्यातील निवडणुका लावा. तुम्ही निवडणुका लावल्या की जनता तुम्हाला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही. असे आव्हान ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोलापुरात केले.
सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने बजेट विरोधात गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारने बजेटमध्ये केवळ गाजर दाखवण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही गाजर आंदोलन केले आहे. कालचा अर्थसंकल्प या गद्दार सरकारने केवळ शब्दांचे इमले बांधून मांडला आहे. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा आणि जनतेच्या हातात गाजर देणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केली.
बडी बडी बाते आणि वडापाव खाते अशी परिस्थिती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. राज्याचे बजेट सहा लाख दोनशे कोटी रुपयाचे बजेट मांडले आहेत. मात्र जीएसटीच्या माध्यमातून केंद्राकडून केवळ 25 हजार कोटी येतात. मग उर्वरित रक्कम कोठून आणणार? हे बोगस बजेट देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. त्यामुळे आम्ही या बजेटचा निषेध करतो, असंही ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हंटलं.
सोलापूरमध्ये विडी कामगार, यंत्रमाग कामगार हा राज्यातील सर्वाधिक इथे आहे. मात्र त्यांच्यासाठी बजेटमध्ये काहीही दिले नाही. एवढ्या रकमेचे बजेट मांडले. मात्र सरकारच्या तिजोरीत तेवढा पैसा नाही. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले होते की हे बजेट समतोल असेल. म्हणजे यांनी आधीच हे ठरवून ठेवले आहे. त्यामुळे आम्ही गाजर दाखवून या अर्थसंकल्पाचा विरोध केलेला आहे, असं पुरुषोत्तम बरडे म्हणाले.