सोलापूर : हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) मातोश्रीसमोर नाही, मारोतीच्या मंदिरात वाचायची असते. नाहीतर संकटमोचक तुमच्या मागे लागेल, मेळच बसायचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नवनीत राणा आणि राज ठाकरेंवर टीका केली. हनुमान चालिसाचे राजकारण करू नका, असेही मुंडे यावेळी म्हणाले. सोलापुरात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. जे कोणी आम्हाला आव्हान देत आहे, त्यांनी आमच्यासमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवावी, असे आव्हानही दिले. भोंगे आणि हनुमान चालिसावरून राज ठाकरे, नवनीत राणांवर टीका करताना त्यांनी आम्हाला धर्म शिकवू नका, असेही म्हटले. शेतकरी (Farmers) मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना हात घालत आणि विश्वगुरू म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.
शेतकऱ्याच्या विरोधात केंद्राने कायदे केले. या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कायदा परत घेईपर्यंत शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकण्यात आले. मात्र तरीही शेतकरी मागे हटला नाही, शेवटी शेतकऱ्यांनी थकवले आणि कायदे मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे एकदा शेतकरी पेटून उठला, तर भल्याभल्यांना वाकवू शकतो, हे दाखवून दिले. स्वत:ला विश्वगुरू समजतात, त्या विश्वगुरूला वाकवायची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या शेतकऱ्याचा पुत्र असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मुंडे म्हणाले.
ज्यांच्या विचारात आणि रक्तात छत्रपती आहेत, त्यांना कुणी सांगायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याची गरज नाही, असे म्हणत मुंडेंनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. कर्जमाफी देण्याची पहिली घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तर शरद पवारांनी दुसऱ्यांदा 2008 साली कृषी मंत्री असताना करून दिली, याची आठवण मुंडेंनी करून दिली.