सोलापूर : सोलापुरातील महानगरपालिकेच्या (Municipal Corporation of Solapur) कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. या आगीचे लोट महामार्गावर आल्यानंतर मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. काल संध्याकाळी 7 वाजता ही आग होती, त्याचे लोट दूरपर्यंत दिसू लागल्यानंतर मात्र आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली असून अग्निशमन दलाच्या (Fire brigade) 50 पेक्षा जास्त गाड्यांमार्फत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र 18 तास उलटून जाऊनही अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे-हैद्राबाद महामार्गावर धुराचे लोट पसरलेले पहायला मिळत आहेत.
सोलापूर महानगरपालिकेचा हा कचरा डेपो (Garbage Depot) 53 एकरमध्ये पसलेला आहे, त्यापैकी 44 एकरवर कचऱ्याचा ढीग असून त्याच कचऱ्याच्या ढिगाला सध्या आग लागली आहे.
या कचरा डेपोला काल आग लागली, तरीही काल या लागलेल्या आगीकडे कोणताही अधिकारी फिरकला नाही. सोलापूर-धुळ राष्ट्रीय महामार्गावर हा कचरा डेपो असल्याने या मार्गावरुन वाहनांचीही प्रचंड वर्दळ असते. कचरा डेपोला आग लागल्यानंतर त्याची तीव्रता कमी होती, त्यामुळे प्रारंभी या आगीकडे कानाडोळा करण्यात आला मात्र हीच आग ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरली तेव्हा महामार्गावर आगीचे लोट, धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. त्यानंतर मात्र सोलापूर महानगरपालिकेला जाग आली.
आगीच्या धुराचे लोट आकाशात आणि महामार्गावर दिसू लागल्यानंतर, त्याच धुरातून वाट काढत वाहन पुढे सरकू लागल्यानंतर महानगरपालिके अग्निशमनची वाहने मागवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावरील कचरा डेपोला आग लागल्यानंतर प्रारंभी आगीने रौद्ररुप धारण केले नव्हते. मात्र बारा तास उलटून गेल्यानंतर मात्र आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे आकाशात आणि महामार्गावर फक्त धुरच धूर दिसत होता. त्यामुळे या धुरातूनच वाहने वाट काढत पुढे सरकत होती.